Breaking News

देशात मोदी लाट कायम

  • बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची मुसंडी
  • विविध राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही सरशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जबरदस्त यश मिळविले आहे. मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र मंगळवारी (दि. 10) मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने आघाडी घेतली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. याचबरोबर विविध राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये ‘कमळ’ फुलल्याचे चित्र आहे. एकूणच देशात मोदीलाट कायम असल्याचे यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.  
बिहार विधानसभेत एकूण 243 जागा असून, जादुई आकडा (मॅजिक फिगर) गाठण्यासाठी 120 जागांची आवश्यकता होती. हा आकडा भाजप-जदयू युतीने दुपारीच ओलांडला. दुसरीकडे महाआघाडीतील राजदने आपले अस्तित्त्व राखले असताना काँग्रेसने मात्र सपाटून मार खाल्ला आहे. लोकजनशक्ती पक्षही करिष्मा दाखवू शकला नाही. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.  
बिहार विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीखेरिज 11 राज्यांतील 58 ठिकाणी विधानसभा पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया झाली होती. यामध्ये मध्य प्रदेशात 28, गुजरातमध्ये आठ, उत्तर प्रदेश व मणिपूरमध्ये प्रत्येकी चार, कर्नाटक, ओडिशा, झारखंड व नागालँडमध्ये प्रत्येकी दोन जागा, तर छत्तीसगड, तेलंगणा आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका जागेचा समावेश होता. याचा निकाल मंगळवारी जाहीर होऊन बहुतांश जागांवर भाजपने यश संपादन केले आहे.
मध्य प्रदेशात भाजपचा झेंडा
भोपाळ : मध्य प्रदेशच्या सत्तेत पुन्हा विराजमान होण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंगले आहे. 28 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपने आघाडी घेत बाजी मारली आहे.
मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. या वेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह सहकारी आमदारांचे सदस्यत्व पक्षांतरांमुळे रद्द झाले होते. त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी सत्तेचा दावा करीत सत्ता स्थापन केली. त्यानंतर 28 जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे मध्य प्रदेशात स्थिर सरकार की पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार यासाठी पोटनिवडणुकीकडे लक्ष लागले होते. यामध्ये भाजपने काँग्रेसला धोबीपछाड दिला.
भाजपला मध्य प्रदेशातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आठ जागा जिंकणे आवश्यक होते. येथील विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 230 आहे. आमदार राहुल सिंह यांनी राजीनामा दिल्याने सध्या 229 आमदार आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 115 जागांचे बहुमत असणे गरजेचे होते भाजपकडे निवडणुकीआधी 107 आमदार, तर काँग्रेसकडे 87 आमदार होते. पोटनिवडणुकीनंतर आता भाजपचे आमदार वाढले आहेत.
गुजरातमध्ये ‘कमळा’चीच जादू
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपला जोरदार यश मिळाले आहे. गुजरातमध्ये झालेल्या आठ जागांच्या पोटनिवडणुकांमध्ये विरोधकांना धक्का बसला आहे. यावर बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस हे बुडते जहाज असून, त्यांनी लोकांशी संपर्क गमावला आहे. सर्वत्र त्यांच्या विरोधात निकाल आहेत. हा नेतृत्व नसलेला पक्ष आहे. गुजरातमधील पोट निवडणुकांचे निकाल हे आगामी काळातील निवडणुकांचा ट्रेलर आहे, असे मुख्यमंत्री रुपाणी यांनी म्हटले आहे.
गुजरातमधील पोटनिवडणुकीत सर्व आठ जागांवर भाजप विजयी आघाडीवर आल्यावर मुख्यमंत्री रुपाणी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, काँग्रेस समाजात अफवा पसरवून निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करते, मात्र गुजरातच्या जनतेने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आगामी पंचायत निवडणुका व 2022मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप उत्कृष्ट प्रदर्शन करेल.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply