ज्या प्रमाणात आपल्याकडे वृक्षलागवड केली जाते त्याप्रमाणात वृक्ष जगत नाहीत हे वर्षानुवर्षे पाहिले गेले आहे. त्याकरिता अधिक सक्षम वृक्षसंवर्धनाची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांना लावलेल्या झाडाचे किमान पाच वाढदिवस साजरे करायला भाग पाडले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. परंतु वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अशी शालेय विद्यार्थ्यांवर टाकता येणार नाही. त्याकरिता अनेक स्तरांवर झाडांची काळजी वाहणारी यंत्रणा अभारावी लागेल.
अभिनेता सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रसरकारच्या वृक्षलागवडीबाबत केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धनही झाले पाहिजे एवढी त्यातली एकच बाब गांभीर्याने घेण्यासारखी दिसते. अन्यथा, अलीकडेच अभ्या राहू लागलेल्या एका चांगल्या लोकचळवळीला या वादापोटी खीळ बसू नये म्हणजे झाले. महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम, 33 कोटींची वृक्ष लागवड हे थोतांड आहे. त्याच त्याच खड्ड्यात वृक्ष लागवड केली जाते आहे आदी आरोप शिंदे यांनी केले आहेत. त्यांच्या आरोपांच्या फैरीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट प्रत्युत्तर दिले असून 33 कोटी वृक्षांची लागवड हा सरकारचा उपक्रम नसून स्वयंप्रेरणेने आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ आहे अशी स्पष्टोक्ती मुनगंटीवार यांनी केली आहे. 33 कोटींची वृक्ष लागवड ही कोणतीही सरकारी योजना नाही, तर ते एक लोकआंदोलन आहे. हे केवळ वनविभागाचे कार्य आहे असा गैरसमज कुणीही करून घेता कामा नये. या कामात गावे तसेच जिल्हा पातळीवरील अनेक संस्था-संघटनांचा सहभाग आहे. सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रात निरनिराळ्या 250 वृक्ष प्रजाती असल्याचे म्हटले होते. तर मुनगंटीवार यांनी सरकारच्या नर्सरीमध्ये 156 प्रजाती असल्याचे सांगितले आहे. इथे सयाजी शिंदे यांचे या क्षेत्रातील काम देखील माहिती करून घेणे उचित ठरेल. ते गेली अनेक वर्षे वृक्ष लागवडीचे काम करीत आहेत. त्यांनी ट्री स्टोरी फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली असून त्यामार्फत इतर वृक्षप्रेमींना सोबत घेऊन ते मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करीत आले आहेत. अर्थात या क्षेत्रातील कामाच्या जोरावरच त्यांनी सरकारला वृक्षलागवडीसंदर्भात प्रश्न विचारले आहेत. यातले काही प्रश्न रास्तही आहेत. उदाहरणार्थ त्यांच्या माहितीनुसार राज्यात वृक्षांच्या 250 प्रजाति आहेत तर सरकारी नर्सरीमध्ये मात्र त्या सर्वच्या सर्व अपलब्ध नाहीत. आता या प्रश्नाचे उत्तर जरुर शोधता येऊ शकेल. त्यांनी कर्नाटकातील वृक्षलागवडीचा दाखला दिला आहे. सयाजी शिंदे यांची कारकीर्द महाराष्ट्रापेक्षा दक्षिण भारतात बहराला आल्यामुळे त्यांना दक्षिणेतील राज्यांचे काम आदर्श वाटणे देखील स्वाभाविक आहे. उरतो त्यांनी अपस्थित केलेला वृक्षसंवर्धनाचा प्रश्न. हे तर देशभरातले जुनेच दुखणे आहे. शिंदे यांच्या संस्थेने यासंदर्भात कोणते वेगळे प्रयत्न केले आहेत ते त्यांनी अवश्य सरकारच्या निदर्शनास आणून द्यावेत. त्याचा लाभ त्यांच्या मायभूमीला झाल्यास आनंदच आहे. परंतु वृक्षलागवडीला प्रोत्साहन देण्याच्या इराद्याने राज्य सरकारने केलेल्या घोषणेला थोतांड म्हणून त्यांनी वाद पेटवू नयेत. वृक्षलागवडीच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी वृक्षवृद्धीचे प्रमाण कमीच आहे. सरकारच्या प्रयत्नांतही तसेच घडले असावे. परंतु त्याविषयीच्या आरोपांमुळे ही लोकचळवळच थंडावल्यास ते राज्याचे मोठे नुकसान ठरेल.