लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजचे उपशिक्षक सुनील गावंड यांची बढतीने संस्थेच्या दक्षिण विभागातील म्हाप्रळ, (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथे मुख्याध्यापकपदी बढती झाली आहे. याबद्दल त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी गावंड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गव्हाण विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंतशेठ ठाकूर व अशोक कडू हे मान्यवर उपस्थित होते.
सुनील गावंड उर्फ एस. आर. गावंड मराठी विषयाचे व्यासंगी अध्यापक म्हणून प्रख्यात असून अत्यंत मनमिळावू अणि अभ्यासू शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये परिचित आहेत. अध्यापनाबरोबरच संगीत कलेमध्ये पारंगत असणार्या गावंड यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संगीत क्षेत्रातही योगदान दिले आहे.
या वेळी सुनील गावंड यांनी त्यांना विशेष मार्गदर्शन करणारे गव्हाण विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर, प्राचार्या साधना डोईफोडे व रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांच्या विशेष सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.