पोलादपूर ़: प्रतिनिधी
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस पोलादपूर तालुक्यातील अपंग बांधवांच्या संघटनेकडून वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार भरत गोगावले यांनी या अपंगांचे कौतुक केले. आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील अपंग बांधवांनी पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, नगरपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय या परिसरात मंगळवारी वृक्षारोपण केले. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून वृक्षारोपणाच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. संघटनेचे तालुका उपाध्यक्ष महमद मुजावर, तालुका महिला अध्यक्षा अलिया धामणकर, उपाध्यक्षा सुनीता माने, शहर अध्यक्षा शमशाद हकिम, सहसचिव पोपट चव्हाण, शहर सचिव प्रशांत पवार, सदस्या संगिता राजन नायर, अस्मिता जगताप आदींनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी चोळई येथील दरडग्रस्त गावाला भेट देणारे भाजपनेते आमदार प्रवीण दरेकर आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांनी अपंग कार्यकर्ते व प्रहार संघटनेच्या सदस्यांचे कौतुक केले.