Breaking News

भाजपची ‘मविआ’ला पुन्हा धोबीपछाड ; विधान परिषद निवडणुकीत पाचही उमेदवार विजयी

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मात देत बाजी मारली आहे. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. सलग दुसर्‍या पराभवामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. विधान परिषदेच्या नऊ सदस्यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे, तर या वर्षाच्या सुरुवातीला भाजपच्या एका सदस्याच्या मृत्यूमुळे 10व्या जागेसाठी निवडणूक झाली. भाजपचे पाच, तर आघाडीचे सहा (शिवसेेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन) असे एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 20) मतदान प्रक्रिया झाली. सकाळपासून आमदार मतदान करण्यासाठी विधानभवनात येत होते. सायंकाळपर्यंत भरघोस मतदान झाले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता, तर दुसरीकडे पुरेसे संख्याबळ नसूनही भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत जबरदस्त चुरस दिसून आली. अखेर या निवडणुकीत राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती झाली. भाजपचे उमेदवार तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे हे पाचही उमेदवार विजयी झाले. त्याचप्रमाणे शिवसेनेचे उमेदवार माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे स्थानिक नेते आमश्या पाडवी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचेही ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे जिंकले, मात्र काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसचे अन्य उमेदवार आमदार भाई जगताप विजयी झाले आहेत.

काँग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती, मात्र निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले. आमदार जगताप व आमदार टिळक हे आजारी असल्याने त्यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मतदानासाठी सहाय्यकाची मदत घेतली होती. ती आयोगाने ग्राह्य ठरविली.

मलिक, देशमुख मतदानास पुन्हा मुकले

राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाने मज्जाव केला. मतदान करण्यास परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टात दाखल याचिका फेटाळून लावल्यानंतर देशमुख, मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळू शकला नाही.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply