Breaking News

चांगल्या कामास कोलदांडा

अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी असे टुमणे काही विरोधीपक्षांनी लावले होते. परंतु ही महत्त्वाकांक्षी योजना ठरल्याप्रमाणेच सुरू होईल. त्यामध्ये आता कुठलाही बदल करण्यात येणार नाही असे लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सांगितले ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. एकंदरीत एका चांगल्या योजनेचे मातेरे करण्यासाठी काँग्रेस आणि अन्य पक्षांनी कंबर कसली आहे तर केंद्र सरकार आणि लष्कराने या विरोधाला न जुमानता पुढे जायचे ठरवल्याचे चित्र दिसते आहे.

कोणाचे भले होत असेल तर एखाद्याच्या पोटात दुखते. सत्ता गेल्यापासून काँग्रेस पक्षाला तर पोटदुखीचा विकारच जडला आहे असे वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित सरकारने गेल्या आठ वर्षांत अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. त्या निर्णयाचे फलित म्हणूनच आज नवा भारत उदयाला आलेला दिसतो आहे. परंतु सत्तेपासून दूर फेकल्या गेलेल्या काँग्रेससारख्या विरोधीपक्षांना त्यामुळेच पोटदुखी जडली आहे. केंद्र सरकारने नुकतीच ‘अग्निपथ’ ही लष्करभरती योजना जाहीर केली. वास्तविक ही योजना अतिशय भविष्यवेधी आहे. या योजनेमुळे भारतातील तरुण पिढीला राष्ट्रकार्यात थेट सहभागी होता येईल.त्याशिवाय स्वत:ची कारकीर्द देखील घडवता येईल. परंतु या योजनेबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात विरोधकांना अंशत: का होईना यश आले असे म्हणावे लागेल. त्याचीच परिणीती म्हणून काही राज्यांमध्ये जाळपोळीच्या आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. परंतु लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संपूर्ण अभ्यासाअंती अग्निपथ ही योजना जनतेसमोर आणली आहे. या योजनेतील सहभाग पूर्णत: ऐच्छिक आहे. तरीही बहकलेल्या तरुणांनी अत्यंत चुकीच्या मार्गाने आपला विरोध दर्शवला. परंतु, योजना तर बंद होणार नाहीच, उलट निदर्शने, जाळपोळ किंवा तोडफोडीमध्ये सहभागी झालेल्यांना या योजनेत स्थान मिळणार नाही असे लष्करातर्फे आता स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अग्निपथ योजनेत भाग घेण्यासाठी निदर्शने, जाळपोळीच्या कृत्यांमध्ये आपण सहभागी झालो नसल्याचे हमीपत्र आता उमेदवारांना लिहून द्यावे लागणार आहे. ही अट केवळ या योजनेचे राजकारण करणार्‍या पक्षांमुळे लादावी लागली आहे हे उघड आहे. ठरल्याप्रमाणे लष्करामध्ये 25 हजार जवानांची पहिली तुकडी डिसेंबरमध्ये सहभागी होईल. या जवानांच्या निवडीसाठी देशभरात भरती मेळावे घेतले जातील. चार वर्षांच्या कारकीर्दीनंतर सशस्त्र दलातून अग्निवीर बाहेर पडतील. नौदल आणि हवाई दलाचा भरती कार्यक्रमही लवकरच सुरू होणार आहे. काही राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या असल्या तरी महाराष्ट्रात मात्र शांतता आहे. तथापि, जनता शांत असली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र अग्निपथ योजनेवर तोंडसुख घेतले. या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी भाष्य करायला हवे होते. हा विषय राजकारणाचा नाही याचे भान सर्वच विरोधीपक्षांनी ठेवणे आवश्यक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर या योजनेचे त्यांनी निश्चितच स्वागत केले असते. काही विषय राजकारणाच्या परिघाबाहेरचे असतात. देशाचे संरक्षण आणि सर्वंकष विकास याबाबतीत राजकारणाचा खेळ होता कामा नये. चांगल्या कामात कोलदांडा घालणे म्हणजे राजकारण असे नव्हे. या वृत्तीमुळे देशाची म्हणजे आपल्या सर्वांची प्रगती खुंटते याचे भान सर्वच पक्षांनी ठेवायला हवे आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply