महाड : प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची 349 वी पुण्यतिथी पाचाड येथे साजरी बुधवारी (दि. 22) करण्यात आली. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त वतीने या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाचाड येथे असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी बुधवारी तिथीप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समाधीस्थळी विधिवत पूजा करण्यात आली. राजमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. राजमाता जिजाऊ यांचे विचार थोर असून भावी पिढीला प्रेरणदायी आहेत, असे प्रतिपादन रायगड जि.प. चे माजी सदस्य बाळ राऊळ यांनी केले. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या संस्कारांचा बोध प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी केले. शिवराज्याभिषेक समितीचे सुनील पवार, सुधीर थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय कचरे, विकास गोगावले, हनुमंत जगताप यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.