Breaking News

टीम इंडियाचे भरगच्च वेळापत्रक

जानेवारी 2022पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव सहन करावा लागल्यानंतर आता टीम इंडियाचे व्यस्त वेळापत्रक समोर आले आहे. कोरोनामुळे अनेक स्पर्धा आणि सामने पुढे ढकलण्यात आले होते, मात्र आता कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने स्पर्धांची एकापाठोपाठ एक मांडणी करण्यात आली आहे.
सध्या भारताचा एक संघ इंग्लंड दौर्‍यावर असून त्याचे नेतृत्व विराट कोहली करीत आहे, तर दुसरा संघ श्रीलंका दौर्‍यावर असून त्याचे नेतृत्व शिखर धवनकडे आहे.
त्यानंतरही टीम इंडिया भरपूर सामने खेळणार आहे. हे व्यस्त वेळापत्रक पाहता खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार असे दिसते.
श्रीलंका दौरा
श्रीलंका दौर्‍यात भारत एकूण तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 13 जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. हे सामने 25 जुलैपर्यंत असणार आहेत.
इंग्लंड दौरा
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. या दौर्‍यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणारी ही मालिका 14 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.
उर्वरित आयपीएल स्पर्धा
या दौर्‍यानंतर आयपीएल स्पर्धेचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. यूएईत हे सामने खेळवले जाणार आहे. ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून उर्वरित 31 सामने खेळवले जाणार आहे. यासाठी 21 दिवसांचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. या 21 दिवसांत 10 डबलहेडर्स, 7 सिंगल हेडर्स आणि 4 प्ले-ऑफचे सामने खेळवले जाणार आहे. टी 20 विश्वचषकाच्या दोन दिवस आधी ही स्पर्धा संपणार आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धा
17 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत यूएईत टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी करोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.
पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. या अहवालानुसार, राऊंड-1मध्ये 12 सामने होणार असून त्यामध्ये आठ संघ भिडणार आहेत. आठपैकी 4 संघ ‘सुपर 12’साठी पात्र ठरतील. यासाठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे. सुपर 12 फेरीत एकूण 30 सामने होणार आहेत. ही फेरी 24 ऑक्टोबरपासून सुरू होईल. या फेरीत 6-6 संघांना दोन स्वतंत्र गटात विभागले जाईल. यानंतर तीन प्ले ऑफ सामने, दोन उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका
टी-20 स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारतीय संघाची न्यूझीलंडसोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका आहे. श्रीलंका दौरा, इंग्लंड दौरा, आयपीएल आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडसोबत खेळणार आहे. या मालिकेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचे डिसेंबर-जानेवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यात तीन कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघांचे येत्या काळात व्यस्त वेळापत्रक असणार आहे. या वेळापत्रकामुळे खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply