बुधवारी दिवसभर जे राजकीय नाट्य शिवसेनेत रंगले, त्याने साधासुधा शिवसैनिक पार गोंधळून गेला असेल. रस्त्यावर आंदोलने करणारा किंवा प्रचारसभा घेणारा राजकीय पक्ष वेगळा असतो आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. विधिमंडळ पक्षाला कायद्याचे अधिष्ठान असते. तो मात्र एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे असे दिसते. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फेसबुक लाइव्ह करून शिवसैनिकांना ‘भावनिक’ आवाहन करावे लागले असावे. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासात किमान चार वेळा या पक्षात बंडाळी झाली आहे. छगन भुजबळ यांनी एकेकाळी शिवसेनाप्रमुखांना थेट आव्हान देत बंड केले होते. पुढे नारायण राणे यांनीदेखील नेतृत्त्वावर घणाघाती आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. नवी मुंबईचे गणेश नाईक यांनी पक्ष सोडला, तेव्हादेखील गहजब उडाला होता. तेव्हाचे युवा नेते राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सवतासुभा मांडला, तेव्हाही प्रचंड गदारोळ उडाला होता. तथापि, सध्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उगारलेले बंडाचे अस्त्र सर्वात दाहक म्हणावे लागेल. फरक एवढाच की आधीच्या चारही बंडाळ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेत पाडलेल्या उभ्या फुटीचा सामना शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकहाती करीत आहेत. चार बंडाळ्या होऊनही स्वर्गीय बाळासाहेबांनी बंडखोरांच्या मनधरणीसाठी दूत पाठवले नव्हते. ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभलेदेखील नसते. शिवाय आव्हान स्वीकारण्याची त्यांची कायमच तयारी असे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने आमदारांनी केलेल्या उठावानंतर शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच उद्धव ठाकरे यांचे दूत बंडखोरांशी बोलणी करण्यासाठी सूरतला रवाना झाले. शिंदे यांनी त्यांना दाद दिली नाहीच. उलट आपल्या समवेत असलेल्या बंडखोरांना सुदूर गुवाहाटीमध्ये रातोरात हलविले. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समवेत गुवाहाटीमध्ये 35हून अधिक बंडखोर आमदार आहेत असा दावा करण्यात आला आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला अवघे 11 ते 14 आमदार हजेरी लावू शकले. बंडखोरांची संख्या तासातासाने वाढतच गेल्याचे चित्रही दिसून आले. शिंदे यांना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हटवण्यात आले असले तरी हा निर्णय कायद्याच्या दृष्टीने निरर्थक ठरू शकतो. कारण संख्याबळ त्यांनाच अनुकूल आहे. शिंदे यांनी तातडीने या घडामोडीची दखल घेऊन पक्ष प्रतोदपदी आपल्या गोटातील भरत गोगावले यांची नियुक्ती केली. शिवसेनेचे बव्हंशी राजकारण हे भावनिक मुद्यांवर आधारित असते. सर्वसामान्य शिवसैनिकाला तीच भाषा समजते आणि रुजते हेदेखील खरे असले तरी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा देण्याची घोषणा करतील असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. परंतु तो फोल ठरला. माझ्याच शिवसैनिकांना मी नको असेन तर मी राजीनामा देण्यास तयार आहे अशी भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुखांनी घातली. यावर मराठी माणूस भावनिक असला तरी मूर्ख नाही अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लागलीच व्यक्त करण्यात आली. तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटल्या. मुळात मुख्यमंत्रीपदी ठाकरे हवेत की नकोत हा वादाचा मुद्दाच नव्हता. स्वर्गीय बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाशी प्रतारणा करू नका, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत कारभार करणे थांबवा अशीच बंडखोरांची मागणी आहे. त्याचा उल्लेखदेखील मुख्यमंत्र्यांनी केला नाही, याला काय म्हणावे?
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …