Breaking News

मराठा आरक्षण मागणार्‍यांविरुद्ध सरकार हुकूमशाहीने वागतेय -दरेकर

मुंबई ः आपल्या न्याय्य हक्काचे आरक्षण मागणार्‍या मराठा तरुणांविरोधात सरकार हुकुमशाहीने वागत असून, याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली आरक्षण मिळण्याच्या मागणीबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी नोकरी न मिळालेले मराठा तरुण आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. दरेकर यांनी रविवारी तेथे भेट देऊन त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या व सोमवारी त्यांनी हा विषय विधान परिषदेत उपस्थित केला.
विशेष बाब म्हणून सभागृहात या महत्त्वाच्या विषयावर चर्चा व्हावी, अशी मागणी दरेकर यांनी केली. मराठा तरुणांना आरक्षण तर मिळत नाहीच, पण आरक्षित गटातून सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच नियुक्त्या मिळालेल्यांना आता स्थगितीमुळे नोकर्‍याही मिळत नाहीत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन करणार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी गावागावातून मराठा तरुण मुंबईत येत आहेत, मात्र पोलीस त्यांना मुंबईच्या सीमेवरच अडवीत आहेत, असेही दरेकर यांनी सांगितले.
आंदोलनासाठी येणार्‍यांना अडवणे ही दडपशाही आहे. या तरुणांना मुंबईत येऊ दिले जात नाही, त्यांना ताब्यात घेऊन तुरुंगात डांबले जात आहे. ही हुकुमशाही असून हे योग्य आहे का याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. या तरुणांच्या नोकरीबाबतही सरकारने आपले म्हणणे मांडावे, असाही मुद्दा दरेकर यांनी उपस्थित केला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply