नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पर्यावरणाची हानी करणार्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. आता 2 ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले असून, प्लास्टिकबंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत. त्याबाबत केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना दिली आहे. याबाबत पर्यावरण मंत्रालयानेही या महिन्याच्या सुरुवातीला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या वस्तू उदा. कृत्रिम फुले, बॅनर, फ्लॅग, फुलदाणी, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक स्टेशनरी साहित्य आदींचा वापर करू नये, असे त्यात म्हटले होते.
केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्लास्टिकच्या अनेक वस्तूंचे उत्पादन बंद होऊ शकते. सध्या प्लास्टिक बॅग (हँडल आणि हँडल नसलेल्या), प्लास्टिक कटलरी, कप, चमचे, प्लेट आदींसह याशिवाय थर्माकोलच्या प्लेट, कृत्रिम फुले, बॅनर, झेंडे, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकचे फोल्डर आदींवर बंदी घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.