एका महिलेसह सहा जणांना अटक
माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कडापूर गावाच्या हद्दीत माणगाव पोलिसांनी शनिवारी (दि. 25) दुपारी सुमारे पाच कोटी 80 लाख रुपये किमतीची पाच किलो 800 ग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी हस्तगत केली असून, या प्रकरणी एका महिलेसह सहाजणांना सापळा रचून पकडले आहे.
रायगड-पाचाड मार्गावरील कडापूर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची खबर माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, माणगाव उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील यांच्या पोलीस पथकाने कडापूर गावाच्या हद्दीत पाळत ठेवली होती. शनिवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास एका झाडाखाली उभ्या असलेल्या पांढर्या रंगाच्या हुंडाई कार (एमएच-02,सीएच-9717) जवळ एक इसम संशयास्पद स्थितीत त्याच्याकडे असलेली प्लास्टिकची गोणी लपवताना आढळून आला. त्याला पोलीस पथकातील मिलिंद खिरीट यांनी जागीच पकडले. त्याच्याकडील गोणीत व्हेल माशाच्या उलटीचा एक मोठा तुकडा आढळून आला. अधिक चौकशीत त्या इसमाने त्याचे नाव दिनेश उमाजी भोनकर (रा. सुरव तर्फे तळे, ता. माणगाव) व व्यवसाय चालक असल्याची माहिती दिली. तसेच त्याने तो व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा दिनेश शेडगे (रा. महाड) याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. या वेळी हुंडाई कारमध्ये असलेल्या वैभव बाबुराव कदम, योगिता वैभव कदम (दोघेही रा. नवीन पनवेल), दत्तात्रय मोहन शेट्ये (रा. गिरगाव मुंबई), सुरेश पंढरीनाथ नलगे (रा. ठाणे पश्चिम), सूर्यकांत वसंत पवार (रा. घणसोली, नवी मुंबई) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच किलो 800 ग्राम वजनाची व्हेल माशाची उलटी आणि एक हुंडाई कार असा एकूण पाच कोटी 62 लाख रुपयांचा मुद्देमाल माणगाव पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकात सहाय्यक निरीक्षक नितीन मोहिते, लहांगे, उपनिरीक्षक गायकवाड, आघाव, सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे, हवालदार प्रशांत पाटील, दर्शन दोड़कुळकर, रावसाहेब कोळेकर, पोलीस नाईक निवेदिता धनावडे, कुंजन जाधव, मिलिंद खिरीट, पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे, श्याम शिंदे, शिवाजी मिसाळ, गोविंद तलवारे, प्रवीण माटे, वनरक्षक अक्षय मोरे यांचा समावेश होता.