Breaking News

पावसाळी पर्यटनासाठी खोपोली सज्ज

परिसर पर्यटकांनी बहरणार

खोपोली : प्रतिनिधी

पावसाच्या आगमनानंतर खोपोली परिसरातील निसर्ग बहरण्यास सुरुवात झाली आहे. सह्याद्री पर्वताच्या हिरव्या  चादरीबरोबरच पांढर्‍या शुभ्र पाण्याचे आकर्षक धबधबे सक्रीय होत आहेत. खंडाळा घाट परिसर हिरवाईने सजत आहे. दाट धुके व रिमझिम पाऊस हे खोपोली परिसराचे खास आकर्षण असून, याच निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले खोपोली व खंडाळा घाटाकडे वळत आहेत. सुट्टीचे दिवस व खास करून शनिवार, रविवारी या भागात हजारो पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आंनद घेण्यासाठी येत आहेत.

खोपोली व खंडाळा घाटाच्या खर्‍या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव व आनंद घेण्यासाठी मान्सूनकाळ सर्वात्तम असतो. जून महिन्यापासून पुढील तीन महिने हजारो पर्यटक हा आनंद घेण्यासाठी खोपोली व खंडाळा घाट परिसरात दाखल होतात. आलेल्या पर्यटकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी येथील पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था व प्रशासनही सज्ज असते. या निमित्ताने खोपोली परिसरातील हॉटेल्स, धाबे, खाऊच्या टपर्‍या फुल होतात व त्यांना उत्तम आर्थिक कमाई होते.

प्रमुख पर्यटन स्थळे  

झेनिथ धबधबा व परिसर, आडोशी तलाव व धबधबा, खंडाळा घाट व तेथील अनेक धबधबे

खबरदारी व काळजी कोणती घ्यावी

अतिवृष्टी काळात येथील पर्यटन जीवघेणे बनू शकते. त्यामुळे पावसाच्या पूर्व अंदाजाची माहिती घेऊनच या परिसरात पर्यटन करावे. अतिउत्साहीपणा नेहमीच दुर्घटनेला आमंत्रण देत असल्याने, त्यापासून लांब रहावे. माहिती नसलेल्या आडमार्गाच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, कोणतीही असुरक्षित किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास स्थानिक पोलीस, आपत्कालीन मदतीला धावून येणार्‍या सामाजिक संस्थाशी तातडीने संपर्क साधावा. यासाठी खोपोली पोलीस, खोपोली अग्निशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते, यशवंती हायकर्स, सहज सेवा फाउंडेशन आदी सामाजिक संस्था कोणत्याही वेळी व प्रसंगी आपल्या मदतीला धावून येतील.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply