Breaking News

मोरबे पाणलोट क्षेत्रात केवळ 18 मिमी पाऊस

मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबईत बुधवारी रात्री 12च्या सुमारास काही काळ जोरधारांचा पाऊस झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुरुवारी दिवसभर मोठ्या पावसाचे वातावरण होते, मात्र दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभरात नवी मुंबई शहरात व मोरबे धरण पाणलोट क्षेत्रात फक्त 18 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जर पुढील दोन-तीन दिवसांत पावसाने जोर घेतला नाही तर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे.

नवी मुंबईत 10 जूनपासून मोसमी पावसाचे आगमन झाले आहे, मात्र आतापर्यंत मोठा पाऊस झालेला नाही. पावसाने गेले 20 दिवस दडी मारल्याने शहरावर कधी नव्हे ती पाणीकपातीची वेळ आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणात गेल्या वर्षीपेक्षा पाचपटीने कमी पातळी असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आणखी काही दिवस पावसाची हीच परिस्थिती राहिल्यास पाणीकपातीची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लागून आहेत.

गुरुवारी रात्री 12च्या सुमारास काही भागांत अर्धा तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे पावसाने जोर धरल्याचे बोलले जात होते, मात्र गुरुवारी दिवसभर शहरात व मोरबे धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू होती. त्यामुळे दिवसभरात फक्त 18 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

दिवसभरात शहरात सर्वाधिक पाऊस नेरुळ परिसरात झाला असून सर्वात कमी पावसाची नोंद ऐरोली विभागात झाली आहे. सायंकाळनंतर पावसाने थोडा जोर पकडला असल्याचे दिसून आले.

पाण्याचे नियोजन सुरू

पालिका प्रशासन शहरातील व मोरबे धरणातील दैनंदिन पावसावर नजर ठेवून आहे. आणखी काही दिवस पावसाने दडी मारल्यास मात्र पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे त्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मिळाली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply