Breaking News

नव्या सरकारला शुभेच्छा!

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप युतीचे हिंदूत्ववादी सरकार अस्तित्वात आले आहे. पक्षनेतृत्वाच्या बदललेल्या भूमिकेविरोधात बंडखोरी केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यानिमित्ताने खर्‍या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या राजवटीत महाराष्ट्र अधोगतीकडे गेला होता. आता राज्याला योग्य मार्गावर आणण्याचे काम नव्या सरकारला करायचे आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडानंतर राज्यातील मविआ सरकार अल्पमतात आले होते. तरीही सरकार वाचविण्यासाठी तिन्ही पक्षांची धडपड सुरू होती. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आशावादी होते, पण सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीस हिरवा कंदिल दर्शविल्यानंतर ठाकरेंचे अवसान गळाले आणि त्यांनी मुख्यमंत्रिपदासह विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर अडीच वर्षांच्या कालावधीनंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले आहे. खरेतर विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला होता. सलग दुसर्‍यांदा काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून युतीचे सरकार सत्तेवर येणार होते, मात्र मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा उपस्थित करून उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेत काँगे्रस-राष्ट्रवादीशी नवी सोयरिक जुळविली. त्या बदल्यात त्यांना स्वत:ला मुख्यमंत्रिपद, मुलाला कॅबिनेट मंत्रिपद आणि बरेच काही मिळाले, मात्र एका हिंदुत्ववादी पक्षाने परस्परविरोधी विचारधारा आणि ध्येय-धोरणे असलेल्या पक्षांसोबत आघाडी करणे जनतेला रूचले नाही. शिवाय शिवसेनेतीलच अनेक आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही ते आवडले नव्हते, पण म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तद्वतच सर्वजण गप्प होते, मात्र पुढे शिवसेना हिंदुत्वाची आपली मूळ भूमिका विसरली आणि दोन्ही काँग्रेस सांगेल त्याप्रमाणे सारे काही होऊ लागले. एवढेच नव्हे तर शिवसैनिक आणि मुख्यमंत्री यांच्यातील अंतर वाढू लागले. एकीकडे विकासनिधीत दुजाभाव, अधिकारहनन आणि त्यातच ‘वर्षा’, ‘मातोश्री’पासून वाढत असलेली दरी यामुळे शिवसेना आमदारांच्या संयमाचा बांध फुटू लागला. शेवटी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंडाचा झेंडा फडकाविला. थोडे-थोडके नव्हे तर शिवसेनेचे 39 आणि इतर अपक्ष आमदार शिंदेंसोबत एकवटले. यातून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात किती नाराजी, असंतोष होता हे दिसून आले. यानंतरही ठाकरेंनी सर्वांना परतीचे आवाहन केले, पण दुसरीकडे ‘बडवे’ मात्र या आमदारांना शिव्या-शाप देत होते, त्यांचा अपमान करीत होते. त्यामुळे बंडखोर आमदारांनी आपल्या पद्धतीने शिवसेना व हिंदूत्व पुढे न्यायचे ठरविले. त्यास भाजपने साथ दिल्याने पुन्हा युतीचे सरकार अस्तित्वात येत आहे. यामध्ये भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून हिंदूहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खर्‍या अर्थाने पूर्ण केले आहे, तर पक्षाचा आग्रह मान्य करून स्वत: उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक अभिनंदन! येत्या काळात त्यांना राज्याची विस्कटलेली घडी पूर्ववत करायची आहे. त्यासाठी शुभेच्छा!

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply