कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांचे आवाहन
मोहोपाडा : प्रतिनिधी
गणेशोत्सव हे सण नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले कोविड 19च्या नियमांचे पालन करून साजरे करावेत, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी, पोलीस पाटील, दक्षता कमिटी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान रसायनी पोलीस ठाण्याचे नव्याने प्रभारी वरिष्ठ निरीक्षक म्हणून कैलास डोंगरे यांना मिळाल्याने त्यांचे उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर यांनी प्रस्तावना वाचन केले. या वेळी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, उपस्थित नागरिकांचे म्हणणे यांवर उपस्थितांनी विचार मांडले. यानंतर कैलास डोंगरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या. कोविड 19मुळे उभ्दवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा शासननिर्णय असून घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरीता चार फूट व घरगुती गणपतीकरिता दोन फुटांच्या मर्यांदेत असावी. जाहिरातीच्या प्रदर्शंनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे, असे सांगितले.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे. जनतेनेही या काळात शांतता व संयम राखावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शुक्ला यांनी केले. गणेशोत्सव साजरा करताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी विसर्जन स्थळी आपले सहकारी ठेवावेत.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम अथवा शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भांतील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शंनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मंल स्क्रिनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी, असेही शुक्ला यांनी सांगितले.
या बैठकीला कैलास डोंगरे, गोरक्षनाथ बालवडकर, मंगेश लांगी आदींसह रसायनी पोलीस, शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील, श्रीगणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी, दक्षता कमिटी पदाधिकारी तसेच परिसरातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.