Breaking News

महाडमधील जमिनीला पडलेल्या भेगेची भूवैज्ञानिकांकडून पहाणी

प्राथमिक तपासांती कोणताही धोका नसल्याची माहिती

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बावळे येथे पावसामुळे भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद यांनी बावळे गाव परिसराला भेट देऊन तेथील जमिनीला पडलेल्या भेगेची पाहणी केली.
महाड तालुक्यातील बावळे गाव परिसरातील जमिनीला पडलेली भेग उत्तर-दक्षिण असून तिची लांबी सुमारे 15 ते 20 मीटर एवढी आहे, तर या भेगेची खोली दीड ते दोन फूट असून त्यात पाणी साठलेले आहे. यावरून ही भेग मातीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पडलेली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तथापि, या भेगेबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांना कळविण्यात आले आहे.
प्राथमिक पाहणीदरम्यान या भेगेमुळे कोणताही धोका संभवत नसून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून या भेगेची दररोज दोन ते तीन वेळा पाहणी करून काही बदल असल्यास स्थानिक प्रशासनास त्वरित कळविण्याबाबत संबंधित सरपंच व गावकर्‍यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply