निर्णायक सामन्यात इंग्लंड विजयी; मालिका बरोबरीत
बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना यजमान संघाने सात गडी राखून जिंकला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची, तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसर्या डावात सर्वबाद 245 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे 377 धावांची आघाडी आली होती, मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवला. पाचवा सामना इंग्लंडने जिंकल्यामुळे मालिका 2-2 अशी बरोबरी सुटली आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 416 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमान इंग्लंडला सर्वबाद 284 धावांपर्यंत मजल मारता आली. आपल्या पहिल्या डावात इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली होती, पण जॉनी बेअरस्टोच्या शतकी खेळीमुळे त्यांना फॉलोऑन टाळण्यात यश आले. 132 धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसर्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा (66) व रिषभ पंत ( 57) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 245 धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर 378 धावांचे लक्ष्य ठेवले.
भारताच्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली (46) व अॅलेक्स लीज (56) यांनी पहिल्या विकेटसाठी 107 धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने 2 धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले, पण जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी 200 धावांची भागीदारी करून सामना फिरवला व विक्रमाला गवसणी घातली. जॉनी बेअरस्टो 145 चेंडूंत 15 चौकार व एक षटकारासह 114 धावांवर, तर जो रूट 173 चेंडूंत 19 चौकार व एक षटकारासह 142 धावांवर नाबाद राहिला.