Breaking News

कळंबुसरे गावातील भात गिरण धुळखात

राज्य सरकारचे शेतकर्‍यांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

एकीकडे केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध उपाययोजना करीत असताना राज्यातील सरकार मात्र शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील शेती संबंधित विभाग मरगळलेल्या स्थितीत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशीच एक उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील सहकारी भात गिरण पडिक अवस्थेत असल्याने येथील शेतकर्‍यांची भात भरडाईसाठी गैरसोय होत आहे.

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उरण पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई सह इतर गावातील नव तरुणांनी आपल्या गावातील शेतकरी आणि गरीब बांधवांना सहकार्य, आर्थिक पाठबळ मिळावा यासाठी कळंबुसरे गावात 30 वर्षांपूर्वी भात गिरणीची उभारणी केली होती, परंतु सहकार क्षेत्रातील अधिकारी आणि भात गिरणीचे भाग भांडवलदार यांनी भात भरडाई करणार्‍या भात गिरणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आज या भात गिरणीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ही भात गिरण धुळखात पडून राहिली आहे.

शेतकरी, गरीब बांधवांना सहकार्य, आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने राज्यात ठिकठिकाणी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक विकसित योजना राबविण्याचा संकल्प हाती घेतला. त्याचा एक भाग म्हणून उरण पुर्व विभागातील चिरनेर कळंबुसरे, मोठी जुई सह इतर गावातील नागरिकांसह इतर शेतकर्‍यांनी भाग भांडवलदार, सभासदांच्या पुढाकाराने कळंबुसरे गावात भात गिरणीची उभारणी 30 वर्षांपूर्वी केली.

भात भरडाई करणार्‍या भात गिरणीचा फायदा हा उरण पुर्व विभागातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात होत असे, परंतु सहकार क्षेत्रातील अधिकार्‍यांनी या भात गिरणीकडे दुर्लक्ष केल्याने आज भात गिरणीच्या परिसराची, वास्तूची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यात पावसाळ्यात इमारतीवरील पत्र्याचे छप्पर उडून गेल्याने पावसाचे पाणी गिरणीवर पडून इलेक्ट्रॉनिक वस्तू नादुरुस्त झाली आहे. तरी सहकार क्षेत्रातील अधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन ही भात भरडाई करणारी भात गिरण पुर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी उरण पुर्व विभागातील शेतकरी करत आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply