Breaking News

रायगडात जोरदार पाऊस; सखल भागांत पाणी साचले

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याला मंगळवारी (दि. 5) सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सतत पडणार्‍या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीदेखील दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. जिल्ह्यातील सावित्री, काळ, कुंडलिका, अंबा, पाताळगांगा, उल्हास व गाढी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मंगळवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यामध्ये सरासरी 143.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तळा तालुक्यात सर्वाधिक 245 मिमी इतका पाऊस पडला.
तालुकानिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये) तळा 245, माणगाव 230, महाड 188, पनवेल 172.20, पोलादपूर 169, उरण 146, पेण 139, खालापूर 135, सुधागड 134, म्हसळा 127, माथेरान 122, मुरूड 116, कर्जत 101.60, रोहा 107, अलिबाग 88, श्रीवर्धन 81. एकूण दोन हजार 300.80, सरासरी 143.80.
1,543 जणांना सुरक्षितस्थळी हलविले
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सहा घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन जिल्हातील 526 कुटूंबांतील एक हजार 543 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. यात महाड तालुक्यातील 273 कुटूंबातील 881 जणांचा, पोलादपूर तालुक्यातील 251 कुटूंबांतील 654 जणांचा आणि माणगाव तालुक्यातील दोन कुटूंबांतील आठ जणांचा समावेश आहे.
8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी
हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सखल व दरडप्रवण गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भरतीच्या वेळी अतिवृष्टी होत असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रयास जावे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी, पर्यटकांनी व नागरिकांनी समुद्रात पोहण्यास जाऊ नये. पूर व दरडप्रवण भागातील नागरिकांनी आपली महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्याने घरातील वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्तींसाठी आवश्यक औषधे, पिण्याचे पाणी, टॉर्च, मेणबत्ती, माचिस, ड्राय फूड यांचा पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते, त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून प्यावे. महिला, लहान मुले यांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply