पनवेल ः वार्ताहर
शासकीय अध्यापक महाविद्यालय येथे पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई येथील प्राचार्या डॉ. मसरत अली उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लेझीम नृत्य, तारपा नृत्याने झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. निलीमा अरविंद मोरे यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुविद्या महेश सरवणकरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे काय? हे समजावून सांगितले. त्यांनी अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकास लिहिलेले पत्र वाचून दाखविले. शेवटी पदवीसाठी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांकडून शपथ घेतली गेली. प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी ठेवावा असे आवाहन केले, तसेच शिक्षण घेण्याची खरोखरच मनापासून जर इच्छा असेल तर कोणतेही संकट हे मोठे नसते. त्यातून मार्ग हा 100 टक्के निघतो. फक्त त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा आवश्यक आहे, असे सांगितले.
या वेळी शैक्षणिक वर्ष 2019-21च्या बी.एड आणि एम.एडच्या छात्राध्यापकांनी पदवी घेण्यासाठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा हेलवाडे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. बिजली दडपे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी डॉ. निलीमा अरविंद मोरे यांनी स्विकारली.