परिसरात दुर्गंधी; वाहिन्या बदलण्याची मागणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार
गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सीबीडीतील जीर्ण मलनिस्सारण वाहिन्यांतून दुर्गंधीयुक्त पाणी गळत आहे. परिणामी, येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सीबीडी सेक्टर 2मध्ये ए टाईपची 19 चौमीची बैठी घरे आहेत, तर सेक्टर 1 येथे बी टाईपची बैठी घरे आणि पोलीस लाईनमध्ये घरे आहेत. ही सर्व वसाहत सिडकोने 40 वर्षांपूर्वी वसवली आहे. येथील मलनिस्सारण वाहिन्या 2009पासून जैसे थे स्थितीत आहेत. नवी मुंबई मनपाने जीर्ण मलनिस्सारण वाहिन्या बदलाव्या अशी मागणी वारंवार करीत असून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक अशोक गुरखे यांनी केली आहे. पावसाळ्यात जोराच्या पावसात मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये पाणी शिरते, पाण्याचा निचरा होत नाही. काही सखल भागातील घरात थेट किचनपर्यंत दुर्गंधीयुक्त पाणी येते. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जीर्ण आणि जुनाट स्थितीत असलेल्या वाहिन्यांमुळे उंदीर, घुशींचा मोठा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. येथील मलनिस्सारण वाहिन्यांच्या समस्येविषयी नवी मुंबई मनपा मुख्य शहर अभियंता संजय देसाई यांना विचारले असता, विशेष परवानगी घेऊन सदर काम करण्याची प्रक्रिया विचाराधीन आहे, असे सांगितले.