पाली ः प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करणे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा शाखा रायगडतर्फे 90 झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ वृक्ष लागवड व संवर्धनासाठी काम करीत आहे. ऑक्सिजन देणार्या झाडांची लागवड करण्याचे आवाहन राज्य शाखेने केले होते. त्याला अनुसरून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या रायगड जिल्हाध्यक्ष स्वाती कदम यांच्या प्रेरणेतून मंडळाच्या सदस्या सुविधा पाटील (सांबरी) यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त 90 झाडांचे रोपण केले. यात आंबा 45, नारळ 30, काजू पाच, फणस, कडुलिंब, चाफा प्रत्येकी एक, पेरू चार, तर चिकूच्या दोन वृक्षांचा समावेश आहे. बालवयात वृक्षारोपणाचे संस्कार झाले तर ही पिढी वृक्षसंवर्धनाला हातभार लावू शकते. पर्यावरण चळवळीस बळकटी देणारा हा उपक्रम आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्य शाखेने दखल घेतली असून मंडळाचे राज्य अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव प्रमोद मोरे यांनी सुविधा पाटील यांच्या कामाचे कौतुक करून मुलास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.