पनवेल ः वार्ताहर
हरिग्राम येथील अशोक माळी यांची 12 वर्षांची मुलगी एंजल अशोक माळी हिला शाळेतील शिक्षिकेने बेदम मारहाण केली. यात तिच्या कानाला मार लागला. त्यामुळे ती भीतीने रात्रभर न झोपता रडत असल्याचे पालकांकडून सांगण्यत आले. या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. एंजल माळी ही केवाळे येथील रामकृष्ण अकॅडमी या शाळेत 8वीत शिकत आहे. कविता पाठ नसल्यावरून तिच्या शिक्षिका उज्जला जाधव यांनी तिला बेदम मारहाण केली असता तिच्या कानाला जबर मार लागला असल्याचे पनवेल तालुका पोलीस स्टेशन तसेच गटशिक्षण अधिकारी यांना लेखी तक्रार केली असून सदर शिक्षिकेवर लवकरात लवकर कारवाईची मागणी मुलीचे वडील अशोक माळी यांनी केली आहे. या प्रकरणी माळी यांनी शाळेच्या मुख्याध्यपिका यांच्याकडे तक्रार केली असता बघतो, करतो अशी उडवा उडवीची उत्तरे दिली असल्याचे कळते. यापूर्वी ही अशा प्रकारच्या घटना या शाळेत घडल्या असून कोणावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याचे पालकांनी म्हंटले आहे. एंजल माळीचा चुलत भाऊ यतिश दत्ता माळी यांच्यावरही उज्जला जाधव याच शिक्षिकेकडून मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी त्याला चार दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या वेळी ही या शिक्षिकेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. या प्रकरणी सदर शिक्षिकेवर संबंधित प्रशासन, अधिकारी यांनी त्वरित कारवाई करावी व एंजल माळी हिला न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरिक समन्वय समितीचे कोकण अध्यक्ष प्रसाद हनुमंते यांनी केली आहे.