मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडीला प्रथम क्रमांकाचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि. 11) पंढरपूर येथे सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन, आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणार्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन ’निर्मल वारी हरित वारी’ अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येतो.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी-पनवेल, जि. रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक-वै.ह.भ.प.भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी-शेरा, ता. रेणापूर, जि. लातूर (75 हजार व सन्मानचिन्ह) आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी-घोटी बुद्रुक, जि. नाशिक (50 हजार व सन्मानचिन्ह) यांना प्रदान करण्यात आले.