खारघर : रामप्रहर वृत्त
सध्या पावसाळा सुरू झाला असून शहरामध्ये पावसाचे पाणी वाहून नेणार्या गटारांची साफसफाई सुरू आहे. ती योग्यप्रकारे केली जात नाही अशा तक्रारी अनेक सेक्टरमधून भाजप संपर्क कार्यालयाला मिळाल्या आहेत.
खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी याबाबतचे एक निवेदन सिडकोचे खारघर नोड अधीक्षक अभियंता श्री. गिरी यांना रायगड भवन येथे दिले. काही ठिकाणी कामे योग्य प्रकारे झालेली नाहीत हे त्यांनीही मान्य केले. अशा विशिष्ट ठिकाणची कामे जी असमाधानकारक आहेत ती निदर्शनास आणून दिल्यास ती कामे पुन्हा योग्य प्रकारे करण्यात येतील व पावसाच्या पाण्याचा निचरा सुलभ करून येत्या पावसाळ्यात पाणी साचू नये याची काळजी घेण्यात येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले. खारघर शहरातील इतर समस्यांबाबतच्या चर्चेत कोपरा पुलाविषयीही त्यांनी महिती दिली. कमकुवत पुलाची प्रथम योग्य दुरुस्ती करून तो वाहतुकीस खुला करण्यात येईल व त्यानंतर त्याच्याच बाजूला शहरात येणार्या पुलाप्रमाणे बाहेर जाणारा पूल नव्याने बांधण्यात येईल, असे त्यांनी याबाबत स्पष्ट केले.