अलिबाग : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 1 ते 31 जुलै कालावधीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, सहा लाख 44 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार 1 जुलै ते 11 जुलै या 11 दिवसात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध प्रजातींच्या दोन लाख 87 हजार 67 वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे यांनी दिली.
वृक्ष लागवड मोहीम प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तिर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे, समुद्र किनार्यावरील खुल्या जागेत, दरड प्रवण क्षेत्रातील डोंगर पायथ्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी, पुरक्षेत्रातील गावामधील नदी किनार्यालगतच्या ठिकाणी राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ 1जुलै रोजी अलिबागमध्ये कुंठेबाग व वरसोली समुद्र किनारी वृक्ष लागवड करून करण्यात आला होता. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात भारतीय प्रजातींची विविध झाडे लावण्यात येत असून, बांबूची बेटे निर्माण करण्याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभाग घेण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात महिनाभरात सहा लाख 44 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट तालुकास्तरावर देण्यात आले होते. त्यामधील 11 जुलैपर्यंत दोन लाख 87 हजार 67 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींनी त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही, त्यांनी वेळेत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
तालुका रोप लागवड उद्दिष्ट झालेली रोप लागवड
अलिबाग 49 हजार 600 58 हजार 600
खालापूर 35 हजार 200 24 हजार 180
कर्जत 43 हजार 200 23 हजार 79
महाड 1 लाख 7 हजार 200 4 हजार 800
माणगाव 57 हजार 600 32 हजार 186
म्हसळा 31 हजार 200 1 हजार 402
पनवेल 55 हजार 200 24 हजार 560
श्रीवर्धन 34 हजार 400 22 हजार 900
पोलादपूर 33 हजार 600 4 हजार 807
मुरुड 19 हजार 200 15 हजार 750
पेण 52 हजार 14 हजार 920
रोहा 51 हजार 200 11 हजार 498
तळा 20 हजार 10 हजार 145
सुधागड 26 हजार 400 26 हजार 400
उरण 23 हजार 11 हजार 840
एकूण 6 लाख 44 हजार 2 लाख 87 हजार 67