Breaking News

उरुग्वेला पॅराग्वेने झुंजवले, तर अर्जेंटिनाची बोलिवियावर एकतर्फी मात

रियो दी जानेरो ः वृत्तसंस्था
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत पॅराग्वेविरुद्ध उरुग्वेने, तर बोलिवियाविरुद्ध अर्जेंटिनाने सामना जिंकला. या दोन सामन्यांमध्ये एकूण सहा गोल्स झाले. उरुग्वेने 1-0च्या आघाडीने पॅराग्वेविरुद्धचा सामना जिंकला, तर बलाढ्य अर्जेंटिनाने 4-1ने बोलिवियाचा धुव्वा उडवला.
उरुग्वे विरुद्ध पॅराग्वे सामना अटीतटीचा झाला. या सामन्यात उरुग्वेचा सहज विजय होईल असे मानले जात होते, मात्र पॅराग्वेने त्यांना चांगलेच झुंजविले. पहिल्या सत्राच्या 21व्या मिनिटाला उरुग्वेच्या एडीन्सन कवानीने मारलेला गोल हा निर्णयाक ठरला. 21व्या मिनिटाला झालेल्या या गोलव्यतिरिक्त सामन्यात एकही गोल झाला नाही. दोन्ही संघांकडे चेंडूचा ताबा जवळजवळ समान कालावधीसाठी होता. उरुग्वेने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करीत तब्बल सहा वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, तर शॉर्ट ऑन टार्गेटमध्ये पॅराग्वेचा स्कोअर शून्यच होता. पॅराग्वेने बचावात्मक खेळाला प्राधान्य दिल्याचे पहायला मिळाले.
दुसरीकडे बोलिविया विरुद्ध अर्जेंटिना सामन्यामध्ये एकूण पाच गोल झाले. त्यापैकी बोलिवियाने एक, तर अर्जेंटिनाने चार गोल केले. सामन्याच्या पहिल्या सत्रामध्येच अर्जेंटिनाने 3-0ची आघाडी घेतली. अर्जेंटिनाच्या संघाने सामन्याच्या सहाव्या मिनिटालाचे आपले गोलचे खाते उघडले. त्यानंतर लिओनेल मेसीने 33 आणि 42व्या मिनिटाला दोन गोल करत आघाडी 3-0वर नेली, पण दुसर्‍या सत्रामध्ये बोलिवियाने संघर्ष करीत सत्र सुरू झाल्यानंतर 15 व्या मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या 60व्या मिनिटाला आपला पहिला आणि सामन्यातील एकमेव गोल नोंदवला, मात्र त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी म्हणजेच सामन्याच्या 65व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या लाऊटारो मार्टेनिजने गोल करीत दोन्ही संघांमधील गोलचे अंतर तीनवर नेऊन ठेवले. या विजयासह अर्जेंटिनाने अ गटामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे.
अशी आहे गटनिहाय क्रमवारी
अ गटामध्ये अर्जेंटिना अव्वल स्थानी आहे. दुसर्‍या स्थानावर उरुग्वे, तर तिसर्‍या स्थानावर पॅराग्वेचा संघ आहे. चौथ्या स्थानावर चिलीचा संघ असून पाचव्या स्थानी बोलिवियाचा संघ आहे. दुसरीकडे ब गटामध्ये ब्राझील अव्वल स्थानी आहे. ब्राझीलनेही अर्जेंटीनाप्रमाणेच चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. पेरू, कोलंबिया, इक्वेडोर आणि व्हेनेझुएला हे संघ अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply