पनवेल : रामप्रहर वृत्त
गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा ही सर्व भारत देशात साजरी केली जाते. गुरूबद्दल आपला आदरभाव व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक चाळके व उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुष्प व भेटवस्तू देऊन सर्व शिक्षकांचे स्वागत केले गेले. विद्यालयातील नववीमधील सविता पाटील, चेतना माळी, अल्फिया चौधरी, प्रियांका मालकर, श्रेया कदम व शैलेश उंडे या विद्यार्थांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल आदर व गुरूचे महत्त्व सांगितले. शिक्षक प्रतिनिधी एस. एन. मोरे व श्री. फर्डे यांनी गुरूबद्दल आपले विचार मांडले. विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपल्या मनोगतातून गुरूमहिमा विविध उदाहरणातून सांगितला. या कार्यक्रमाचे निवेदन काजल नरसाळे हिने केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील उपशिक्षक अनिल पाटील, डी. जी. खुटले व सहाने यांनी केले.
रामशेठ ठाकूर विद्यालयात गुरूपौर्णिमा
खारघर : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 13) गुरूपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. प्राचार्या निशा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी गुरू आणि शिष्य यांचे नाते कसे असावे याबद्दल आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते व्यास मुनीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या गायनातून गुरूबद्दलची आपली निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का कांबळे आणि अर्णव शिंदे यांनी केले. कार्यक्रम व्यवस्थितरित्या व्हावा म्हणून विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले़ आभार स्नेहा तोडेकर हिने मानले. कार्यक्रमाकरिता संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. गडदे यांनी शुभेच्छा दिल्या.