Monday , June 5 2023
Breaking News

कर्जत तालुक्यात बिबट्याचा संचार; जनावरांवर हल्ला; ग्रामस्थ धास्तावले; वनविभागाकडून गस्त

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील शिरसे येथे मागील महिन्यात बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन झाल्यानंतर मागील तीन दिवस आसल आणि बेकरे भागात बिबट्याचे दर्शन झाले. त्याने काही जनावरांना आपले लक्ष्य केल्याने कर्जत तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बेकरे, जुम्मापट्टी भागात ग्रामस्थांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे, तर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणण्याची तयारी सुरू केली आहे. कर्जत तालुक्यात आजही 25 टक्के क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्या भागात दरवर्षी हिंस्त्र प्राणी दिसून येत असतात. मागील काही वर्षात खांडस, अंभेरपाडा, पाली, पोटल, हुमगाव या भागात बिबट्याने शेळ्या, मेंढ्या आणि गायी यांना शिकार केले होते. मागील डिसेंबर महिन्यात तालुक्यातील शिरसे भागात दोन दिवस बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन ग्रामस्थांना झाले होते. त्यानंतर प्राणीगणना करताना कर्जत पश्चिम विभागाचे वनरक्षक सुहास मगर यांना पहाटेच्या वेळी आसल भागातील जंगलात बिबट्याचे दर्शन झाले. त्या बिबट्याचे वयोमान साधारण दोन वर्षाचे असेल, अशी माहिती वनक्षेत्रपाल निलेश भुजबळ यांनी दिली. त्यानंतर वनविभाग सतर्क झाला आहे, मात्र मागील दोन दिवस बेकरे गावाच्या घनदाट जंगलात बिबट्याने दर्शन दिले. या बिबट्याने सहा कुत्र्यांना फस्त केले आहेत. तर एक म्हैस आणि काही जनावरांना बिबट्याने जखमी केले आहे. त्यामुळे बेकरे ग्रामस्थांनी रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. 22 जानेवारीच्या रात्री मानवी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न करीत असलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी आरडाओरड करून पिटाळून लावले, अशी माहिती वनविभागाने दिली. बिबट्या मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल भुजबळ यांनी सोमवारी (दि. 24) अलिबागला जाऊन जिल्हा उपवन संरक्षकांकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा नेण्याची परवानगी मागितली आहे.

बिबट्याचा वावर दिसून आल्यास ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला कळवावे. स्थानिकांनी रात्रीच्या वेळी एकटे घराबाहेर पडू नये, स्वत:ची काळजी घ्यावी. वन कर्मचारी आणि पोलीस यांच्याकडून गस्त घालण्यात येत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

-निलेश भुजबळ, वनक्षेत्रपाल, कर्जत पश्चिम

आमच्या गावाजवळील जंगलाला लागून असलेल्या मानवी वस्तीत काल बिबट्या घुसला होता. गस्तीवर असलेल्या ग्रामस्थांनी त्याला पिटाळून लावल्याने अनर्थ टळला आहे.

-संदेश कराळे, ग्रामस्थ, बेकरे, ता. कर्जत

बिबट्या मानवी वस्तीत घुसून हल्ला करण्याची भीती लक्षात घेता प्रशासनाकडून वनविभागाला खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लागणार असेल तर त्याबाबत उचित कार्यवाही करण्याची सूचना प्रशासन देईल.

-अजित नैराळे, प्रांत अधिकारी, कर्जत

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply