Breaking News

जनरल कामगार संघटनेकडून जेएनपीए प्रशासनाला संपाची नोटीस

उरण : रामप्रहर वृत्त

जेएनपीए बंदरात जवळपास 950 कामगार विविध सोसायट्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स म्हणून काम करीत आहोत. त्यांच्या वेतन कराराचा कालावधी संपून 27 महिने झाले तरी जेएनपीए प्रशासन नवीन करारावर सह्या करण्यास चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ जेएनपीए जनरल कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय संपाची नोटीस जेएनपीए प्रशासनाचे चिफ मॅनेजर (सेक्रेटरी) जयंत ढवळे यांना युनीयनचे अध्यक्ष सुरेश पाटील व कार्याध्यक्ष सुधीर घरत, जनरल सेके्रटरी जनार्दन बंडा यांनी दिली.

जेएनपीएमध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स हे स्थानिक प्रकल्पग्रस्त असून विविध सोसायट्यांमध्ये कार्यरत आहेत. जुना करार 31 मार्च 2020 रोजी संपुष्टात आला. 27 महिन्यांचा कालावधी होऊनसुध्दा विशेषतः जेएनपीएचे चेअरमन यांच्या समवेत झालेल्या चर्चेत युनियनचे सल्लागार आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत पगारवाढ व इतर सर्व विषयांवर चर्चा पूर्ण होऊनसुध्दा करारावर सह्या करण्यास प्रशासनाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

अंतिम चर्चा होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनसुध्दा प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य वेळकाढूपणा करीत आहेत. याच्या निषेधार्थ जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या वतीने 29 जुलै 2022 रोजी एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्याची नोटीस प्रशासनाला दिली आहे. या वेळी संघटनेचे जनरल सेके्रटरी जनार्दन बंडा, मिन्नाथ भोईर, हरेश मढवी व इतर कामगार उपस्थित होते.

सूचना देऊनही दुर्लक्षच -सुधीर घरत

कामगारांना केंद्रीय किमान वेतन द्यावे, अशा सूचना जेएनपीएचे चेअरमन यांनी देऊनसुध्दा अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. हे अधिकारी स्वतःला जेएनपीए चेअरमनपेक्षा मोठे समजतात काय? असा सवाल युनियनचे कार्याध्यक्ष व भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाचे कोषाध्यक्ष सुधीर घरत यांनी केला आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply