127 घरांची पडझड, एकाचा मृत्यू, 597 कुटुंबे स्थलांतरित
पाली : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र दाणादाण उडाली. जिल्ह्यात विविध ठिकाणी 127 घरांची पडझड झाली. एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. प्रशासनाने खबरदारी घेत तब्बल 597 कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.
पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदी पुलावरून सलग तीन ते चार दिवस पाणी गेल्यामुळे येथील वाहतूक कित्येक तास कोळंबली होती. याच मार्गावर तकसई गावाकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी प्रवासी व वाहन चालक यांची खूप गैरसोय झाली.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती दैनंदिन अहवालातील माहितीनुसार जिल्ह्यात पूर्णतः पडलेली घरे 18 आहेत. त्यात सात पक्क्या घरांचा समावेश आहे. त्यामध्ये मुरूड आदिवासी वाडी, खानाव (ता. अलिबाग), साई (ता. माणगाव), तामसोली (ता. रोहा), वांगणी (ता. खालापूर), मंगोशी प्रधानवाडी व पाडले (ता. पेण) येथील एका घराचा समावेश आहे. तर वडविहीर-चिंचखांबाला (ता. पोलादपूर), चोपडा व टेंभरी (ता. खालापूर), हिरकणीवाडी व कोंझर (ता. महाड), माकटी व निजामपूर (ता. माणगाव), मोठी धामणी (ता. पनवेल), जांभूळपाडा आदिवासीवाडी (ता. उरण) आणि खारखर्डी (ता. रोहा) येथील एकूण 11 कच्ची घरे पुर्णतः पडली आहेत.
रायगड जिल्ह्यात अंशतः पडलेली घरे एकूण 109 असून यामध्ये पक्की घरे 51 तर कच्ची घरे 58 आहेत. पडझड झालेल्या झोपड्यांची संख्या 13 असून यामध्ये अंशतः पडझड झालेल्या झोपड्या आठ व पूर्णतः पडझड झालेल्या झोपड्या पाच आहेत. अंशतः पडलेल्या पोल्ट्री शेड दोन आहेत. 15 सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
उरण जांभूळपाडा आदिवासी वाडी येथे घर पडून एकाचा मृत्यू तर पेण तालुक्यातील पाडले येथे एक व्यक्ती जखमी झाला.
नागरिक स्थलांतरित
दरडप्रवण/पूरप्रवण गावांमधून कॅम्प किंवा नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची संख्या 597 असून यामध्ये नागरिकांची संख्या 1929 आहे. 288 कुटुंबातील 1032 व्यक्ती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले असून 22 कॅम्पमध्ये 309 कुटुंब व त्यातील 897 व्यक्तींची व्यवस्था निवारा शेडमध्ये करण्यात आली आहे.
गोठे व पशुधन हानी
बाधित गोठ्यांची एकूण संख्या 32, त्यामध्ये पूर्णतः हानी झालेले गोठे पाच व अंशतः हानी झालेले गोठे 27 आहेत. पशुधन हानी एकूण 27 जनावरे असून त्यामध्ये मोठी जनावरे सहा व लहान जनावरे 21 आहेत.