शेअर बाजारातील तांत्रिक विश्लेषणाविषयी अनेक गैरसमज आहेत.ते दूर करून या विश्लेषणाकडे पाहण्याची गरज आहे.शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाबरोबरच त्या विषयाचं सखोल शिक्षण, संपूर्ण ज्ञान, उत्तम पैसे व्यवस्थापन कौशल्य आणि भरपूर शिस्त आवश्यक आहे.
तांत्रिक विश्लेषण या भागातील लेखात आपण टेक्निकल अॅनालिसिसचे फायदे जाणून घेतले. आता आणखी कांही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.. तांत्रिक विश्लेषण हा विषय जाणून घेण्याआधी त्याबद्दलचे गैरसमज काय आहेत ते पाहूयात.
- तांत्रिक विश्लेषण फक्त इंट्राडे ट्रेडिंगसाठी आहे – हा तांत्रिक विश्लेषणाबद्दल एक अतिशय सामान्य समज आहे. परंतु तांत्रिक विश्लेषणाचा इतिहास सांगतो की संगणक उत्क्रांती होण्यापूर्वीपासून ते अस्तित्वात होतं. म्हणजे नंतर संगणक आले मग शेअर्सचे व्यवहार संगणकाद्वारे होऊ लागले. त्यानंतर दैनंदिन सौदेपूर्ती होऊ लागली व त्यामुळं डे-ट्रेडिंगचा जन्म झाला. त्यामुळं तांत्रिक विश्लेषण हे शेअरच्या किंमतीतील चढ-उतार यांचा अभ्यास करून दीर्घकालावधीसाठीचे खरेदी-विक्री निर्णय घेण्यास देखील मदत होते, अर्थातच तांत्रिक विश्लेषणाचा जास्त उपयोग इंट्रा-डे ट्रेडिंगसाठी करून घेता येऊ शकतो कारण दररोज, मिनिटागणिक कंपन्यांची मूलभूत तत्त्वं बदलत नाहीत परंतु क्षणागणिक त्यांच्या शेअर्सच्या भावात फरक पडत असतो.
- तांत्रिक विश्लेषणाचा वापर केवळ लहान/फुटकळ व्यापार्यांद्वारेच केला जातो – हा आणखी एक सामान्य गैरसमज आहे, परंतु मोठे कॉर्पोरेट्स, हेज फंड्स, वित्तसंस्था यांच्याकडं शेअरबाजाराचं अथवा शेअरच्या भावाचं तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी एक समर्पित टीम असते आणि ते अल्गो आधारित आणि उच्च आवर्ततेचे व्यवहार करतात आणि एक्सचेंजवर मोठ्या प्रमाणात उलाढाल करत असतात. त्यामुळं तांत्रिक विश्लेषणाचा आधार छोटे-लहान ट्रेडर्स व कोट्यवधींची उलाढाल करणारे मोठे ट्रेडर्स देखील घेऊ शकतात.
- तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे किंमतीच्या लक्ष्यांचा अचूक अंदाज लावता येतो – नवशिके किंवा अननुभवी ट्रेडर्स अचूक किंमतीबिंदूंसह बाजाराचा अंदाज लावायचा प्रयत्न करतात परंतु दिग्गज किंवा मुरलेले ट्रेडर्स किंमतपट्टा जोखून बाजाराचा अंदाज लावतात. एखाद्यानं हे समजून घेतलं पाहिजे की, तांत्रिक विश्लेषणाधारे अचूक किंमत ठरवता येत नाही तर एक पातळीच्या आधारे संभाव्य किंमतपट्ट्याचा अंदाज लावता येतो.
- तांत्रिक विश्लेषण सोपं आहे – यूट्यूबर्स आणि तांत्रिक विश्लेषण शिकवणार्या लोकांच्या दाव्यांमुळे सर्वात मोठा गैरसमज हा ट्रेडर्स जगतात निर्माण झाला आहे की, तांत्रिक विश्लेषण हे खूप सोप्पं आहे. असे कोर्स विकणारे किंवा तांत्रिकी विश्लेषणाचे सॉफ्टवेअर विक्रेते यशाची अगदी 100% हमी देतात व तसाच प्रचार करतात ज्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाबरोबरच त्या विषयाचं सखोल शिक्षण, संपूर्ण ज्ञान, उत्तम पैसे व्यवस्थापन कौशल्य आणि भरपूर शिस्त आवश्यक आहे.
तांत्रिक विश्लेषणाची तत्वं
- प्रत्येक घडामोडीचं प्रतिबिंब बाजारात उमटतं (Market discounts everything) – तांत्रिक विश्लेषणात ’का’ पेक्षा ’कसं’ यास जास्त महत्व आहे – एखाद्या कंपनीच्या शेअर्सच्या भावात लक्षणीय चढाव अथवा उतार ’का’ झाले यापेक्षा ते ’कसे’ झाले हे तांत्रिक विश्लेषण नमूद करतं.तांत्रिक विश्लेषणाबाबत एक मोठी टीका ऐकू येते की तांत्रिक विश्लेषणामध्ये कंपनीच्या मूलभूत घटकांकडं दुर्लक्ष करून केवळ शेअरभावातील चढ-उतारांचा विचार केला जातो. तथापि, तांत्रिक विश्लेषण असं गृहीत धरतं की, कोणत्याही वेळी कंपनीच्या मूलभूत गोष्टींवर प्रभाव टाकणार्या किंवा प्रभावित करणार्या प्रत्येक गोष्टीचं प्रतिबिंब गोष्ट हे त्या कंपनीच्या शेअरच्या भावात उमटत असतं. तांत्रिक विश्लेषकांचा असा विश्वास आहे की कंपनीच्या मूलभूत तत्त्वांसह, व्यापक आर्थिक घटक आणि बाजाराची मानसिकता, या सर्व घटकांचा स्वतंत्रपणे विचार करण्याऐवजी ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे त्या कंपनीच्या शेअरभावावर परिणाम करत त्या कंपनीच्या शेअरचे भाव ठरवत असतात.त्यामुळंच केवळ शेअरभावातील चढ-उतारांचं विश्लेषण महत्वाचं ठरतं, जे तांत्रिक सिद्धांत बाजारातील अथवा विशिष्ट शेअरची पुरवठा व मागणी संबंध अभ्यासतं.
- शेअरच्या किंमती या एका कलरेषेत वाटचाल करतात
तांत्रिक विश्लेषणामध्ये, भावातील बदल हे एखाद्या कलरेषेस अनुसरुन चालतात असं मानलं जातं. याचा अर्थ असा की एकदा बाजारातील कल प्रस्थापित झाल्यानंतर, भावी किमतीची हालचाल त्याच्या विरोधात असण्यापेक्षा त्या दिशेनं असण्याची अधिक शक्यता असते. बहुतेक तांत्रिक धोरणं या गृहीतकावर आधारित आहेत.
बाजारात तीन प्रकारचे कल असतात, उर्ध्वमुखी, अधोमुखी व यां दोन्ही दरम्यान. आणि डाऊ थिअरीनुसार, बाजारात तीन कलप्रकार आहेत.
प्राथमिक किंवा मुख्य कल – बाजारामधील हा प्रमुख कल असतो. हा कल सूचित करतो की दीर्घकालीन व्यापक बाजाराची वाटचाल कशी होती. प्राथमिक कल अनेक वर्षे टिकू शकतो.
दुय्यम कल – दुय्यम कल हा प्राथमिक ट्रेंडमधील सुधारणा मानला जातो. त्यामुळं हा कल प्राथमिक प्रवृत्तीच्या विरुद्ध हालचाल दर्शवतो. उदाहरणार्थ, जर प्राथमिक कल वरच्या दिशेनं (तेजी) असेल, तर दुय्यम कल खालच्या दिशेनं असेल. हा प्रकार कांही आठवडे ते काही महिन्यांचा असू शकतो.
उदाहरण – तेजीच्या बाजारातील सुधारणा, मंद बाजारातील दीर्घ रॅली आणि रिकव्हरी. हा कल कांही आठवडे ते अनेक महिन्यांदरम्यान टिकू शकतो.
छोटे कल – हे बाजारातील दैनंदिन हालचालीतील चढउतार असतात. साधारणपणे हे असे कल एका महिन्यापेक्षा कमी काळ टिकतात आणि दुय्यम ट्रेंडच्या हालचालींच्या विरोधात जातात.
- इतिहासाची पुनरावृत्ती – तांत्रिक विश्लेषणातील आणखी एक महत्त्वाची कल्पना अशी आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, मुख्यत्वे किमतीच्या चढ-उताराच्या बाबतीत. किमतीच्या हालचालींच्या पुनरावृत्तीचा संबंध बाजारातील ढोबळ मानसिकतेशी लावला जातो. बाजारातील हालचालींचं विश्लेषण करण्यासाठी आणि कल समजून घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण विविध आलेख प्रकार वापरतं. जरी यापैकी बरेच आलेख प्रकार हे 100 वर्षांहून अधिक काळ वापरले गेले असले तरी, ते अद्यापही अबाधित आहेत असं मानलं जातं कारण ते किंमतींच्या हालचालींमधील नमुने दर्शवतात जे वारंवार स्वतःला पुनरावृत्तीत होतात.
पुढील लेखांत आपण बाजाराच्या विविध अवस्था पाहू.
-प्रसाद ल. भावे, अर्थप्रहर