Breaking News

बीसीसीआयच्या नव्या फिटनेस टेस्टमध्ये सहा क्रिकेटपटू नापास

वर्ल्डकपमधून बाहेर होण्याचा धोका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतासाठी खेळाडूंच्या दुखापती चिंतेचा मुद्दा ठरला. भारतीय चमूतील 10 खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचे दिसले. प्रत्येकाच्या दुखापतीचे कारण वेगवेगळे असले तरी बीसीसीआयने याची गंभीर दखल घेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत सतर्कतेच्या दृष्टीने खेळाडूंची टाइम ट्रायल टेस्ट घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार भारत-इंग्लंड टी-20 व वन डे मालिकांआधी काही खेळाडूंची टेस्ट घेण्यात आली. त्यात नवोदित खेळाडू संजू सॅमसनसह सहा खेळाडू नापास झाले आहेत.
टाइम ट्रायल टेस्टमध्ये खेळाडूंना दोन किलोमीटरपर्यंतचे अंतर धावत पूर्ण करावे लागते. हे अंतर ठरावीक वेळेतच पूर्ण करणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सुमारे 20 खेळाडूंची टाइम ट्रायल टेस्ट घेण्यात आली. त्यात संजू सॅमसन, नितीश राणा, राहुल तेवातिया, सिद्धार्थ कौल, जयदेव उनाडकट आणि इशान किशन नापास झाले.
ही फिटनेस चाचणी नवी आहे. त्यामुळे नापास खेळाडूंना दुसरी संधी दिली जाईल. त्यांना तयारी करण्यासाठी वेळ देण्यात येईल आणि काही दिवसांनी त्यांची पुन्हा चाचणी घेतली जाईल. दुसर्‍या संधीतही कोणी खेळाडू नापास झाले, तर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि वन डे मालिकांसाठी त्या खेळाडूंचा विचार करण्याची शक्यता कमी होईल, असे सूत्रांनी सांगितले.
टाइम ट्रायल टेस्टमध्ये खेळाडूंना दोन किलोमीटरचे अंतर धावत ठरावीक वेळेतच पूर्ण करणे आवश्यक असते. वेगवान गोलंदाजांना हे अंतर पूर्ण करण्यासाठी आठ मिनिटे 15 सेकंद दिली जातात, तर यष्टीरक्षक व फिरकीपटूंसाठी ही वेळ आठ मिनिटे आणि 30 सेकंद इतकी आहे. यासोबत यो-यो टेस्टचा स्कोअरदेखील 17.1 इतका असणे आवश्यक आहे. बीसीसीआच्या वार्षिक योजनेत करारबद्ध असलेल्या अनुभवी खेळाडूंपासून ते अगदी नवख्या खेळाडूंपर्यंत सार्‍यांना या दोन्ही टेस्ट द्याव्या लागणार आहेत. त्यात फिटनेसच्या बाबतीत अव्वल असणार्‍या खेळाडूंकडून हे अंतर सहा मिनिटांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे, तर अगदीच नवख्या खेळाडूंना या टेस्टसाठी 15 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. दरम्यान, खेळाडूंनी दोन्ही फिटनेस टेस्ट द्याव्यात यावर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांचेही एकमत आहे. त्यामुळे आता दोन्ही टेस्ट घेतल्या जाणार आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply