साकारला ’रॉयल’ विजय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
मुंबई इंडियन्सने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर डगमगलेल्या मुंबई इंडियन्सची गाडी ह्या सामन्यात रुळावर आल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे संघासाठी ही चांगली गोष्ट मानली जात आहे. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने 50 चेंडूंत सर्वाधिक नाबाद 70 धावा केल्या. यात पाच चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी सलामीसाठी 49 धावांची भागीदारी रचली. रोहित शर्माला राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन साकरिया याने झेलबाद केले. रोहितने 17 चेंडूंत 14 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार आणि क्विंटन यांनी दमदार फलंदाजी करीत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. सूर्युकमारने 10 चेंडूंत 16 धावा केल्या, तर अखेरच्या षटकात कृणाल पांड्याने फटकेबाजी करीत 26 चेंडूंत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. कृणालने यात दोन उत्तुंग षटकार आणि दोन चौकार ठोकले. कायरन पोलार्ड 8 चेंडूंत 16 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने 2 विकेट्स घेतल्या, तर मिस्तफिजूर रेहमनाला एक विकेट मिळाली.
दरम्यान, राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. दोघांनी सलामीसाठी 66 धावांची भागीदारी रचली. जोस बटलरने 32 चेंडूंत 41, तर यशस्वी जयस्वालने 20 चेंडूंत 32 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून राहुल चहर आणि बुमराह वगळता इतर कोणताही गोलंदाज खास कामगिरी करू शकला नाही. जयंत यादवच्या तीन षटकांत राजस्थानच्या फलंदाजांनी 33 धावा कुटल्या, तर संघात संधी देण्यात आलेल्या नेथन कुल्टर नाइल यालाही राजस्थानच्या फलंदाजांनी धुतले. कुल्टर नाइलने सामन्यात चार षटके टाकून एकही विकेट न घेता 35 धावा दिल्या.