Tuesday , February 7 2023

वाहतूक कोंडीने नेरळवासी त्रस्त

भर गणेशोत्सवात बाजारात वाहनांच्या रांगा

कर्जत : बातमीदार

नेरळ गावात गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी दरवर्षीप्रमाणे होते, मात्र पाडा गेट आणि माथेरान-नेरळ रस्त्यावर नेरळ गावात होणारी दररोजच्या वाहतूक कोंडीला सर्व कंटाळले आहेत. पोलीस प्रशासन अवजड वाहनांना सणाच्या काळात प्रतिबंध घालण्यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीला सर्वांना सामोरे जावे लागत आहे.

नेरळ शहरात सध्या वाहतूक कोंडीचा फटका बसत असून ही मोठी समस्या निर्माण होऊन बसली आहे. वाहने रस्त्यात पार्क करण्याच्या पद्धतीने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. नेरळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर खाजगी वाहनचालक आपली वाहने रस्त्यावरच उभी करून बाजारात जात आहेत. त्यामुळे शहरात रस्त्यांवर वाहनांची कोंडी होत आहे. त्यात नेहमीच गजबजलेला असलेला नेरळ अंबिका नाका ते हेटकर आळी या रस्तावर वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत.वाहनचालक यांच्या या नवीन प्रथेमुळे गेली काही महिने वाहतूक कोंडी होत असून अन्य वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

शिवाय नेरळ मारुती मंदिर या परिसरातील रस्त्यावर देखील वाहने लावली जात असून वाहतूक कोंडी होत आहे.त्यात याच भागात बँका असून त्यांच्यामुळे या परिसरात बँकेत येणारे खातेदार देखील रस्त्यावर वाहन पार्क करून तासन्तास वाहने तेथेच उभी ठेवलेली पाहायला मिळतात.शिवाय येथे लहान मुलांचे खाजगी रुग्णालय देखील असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यात उभी केली जात आहे. या पार्क केलेल्या वाहनावर येथील स्थानिक प्रशासनाचा अंकुश नसल्याने येथील खाजगी वाहनचालकांचे फावले असून यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे.

नेरळ शहराच्या मुख्य बाजारपेठेतूनच माथेरान-नेरळ-कळंब हा राज्य मार्ग जात आहे, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल सुरू असते. त्यामुळे या वाहनांना रस्त्यात पार्क केलेल्या वाहनांचा अडसर होत असून परिणामी येथे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.गणेशोत्सव सुरू होत असल्याने आणखी वाहतूक कोंडी होऊन या वाहतुकीचा त्रास आता स्थानिकांना सहन करावा लागत असून रेल्वे फाटकदेखील वाहतूक कोंडीची समस्या बनले आहे. फाटक बंद झाल्यानंतर अंबिका नाक्यापर्यंत तर पलीकडे मातोश्रीनगरपर्यंत वाहनांची रांग लागते. हे सर्व दररोज घडत असून ही वाहतूक कोंडी नेरळकरांसाठी समस्या बनली आहे.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply