दारूबंदीचा कायदा करून निर्बंध लादले की आपले काम संपले असा जो प्रशासकीय यंत्रणेचा खाक्या असतो, त्यातील सांधीफटी आता उघड होत आहेत. निव्वळ दारूबंदीचा कायदा करून भागणार नाही तर प्रबोधनाच्या मार्गानेच हे काम पूर्ण करावे लागेल. गुजरातमधील शोकांतिकेपाठोपाठ दारूबंदीबद्दल तपशीलात लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्याकडची गटारी अमावस्या. गेल्या काही वर्षांत गटारी साजरी करण्याचे फॅड प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसते.
भारतीयांसाठी पवित्र मानला गेलेला श्रावणाचा महिना उंबरठ्यावर आला आहे. गुरूवारी दीपवती अमावस्या पार पडली की व्रतवैकल्यांचा श्रावणमास सुरू होईल. अशा पवित्र महिन्याच्या तोंडावरच गुजरातमधील बोटाद या गावी विषारी दारूच्या सेवनाने किमान 35 जणांचा हकनाक बळी गेल्याचे वृत्त हाती आले आहे. गुजरातमध्ये खरे तर सरसकट दारूबंदी आहे. पूज्य महात्मा गांधींची भूमी म्हणून गुजरातला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु दारूबंदी असूनही सौराष्ट्रातील बोटाद येथे 35 जण बळी गेले ते दारूमुळेच. यातील बहुतेक जण हे शेतमजूर वा सफाई कामगार होते. याचाच अर्थ असा की ज्या दारूचे सेवन त्यांनी केले, ती अर्थातच स्वस्तातली होती. गुजरातमध्ये दारूबंदी असली तरी काळ्या बाजारात थोडे जास्त पैसे देऊन मद्य सहजी मिळवता येते हे उघड गुपित आहे. तशी बिहारमध्ये देखील दारूबंदी आहे. मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी काही वर्षांपूर्वी बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि विषारी दारूसेवनाच्या दुर्घटना दोन्ही राज्यात अधुनमधून घडत असतातच. वास्तवत:, दारूबंदी हा दीर्घकालीन आणि सतत राबवण्याचा कार्यक्रम आहे. शालेय स्तरापासूनच दारूचे दुष्परिणाम बालमनावर बिंबवले तर कदाचित अपेक्षित सकारात्मक परिणाम पुढील पिढ्यांमध्ये दिसून येऊ शकतील असे वाटते. अर्थात हा विषय बालमानस तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांनी हाताळण्याचा आहे. महाराष्ट्रात देखील वर्धा जिल्ह्यात तसेच चंद्रपूरमध्ये दारूबंदीचे निर्बंध आहेत. परंतु अलीकडेच जे सरकार पायउतार झाले त्या सरकारला दारूबंदीविषयी फारसे प्रेम नव्हते. सरकारी तिजोरी भरण्याच्या नावाखाली करामध्ये कपात करून महाविकास आघाडी सरकारने दारू आणखी स्वस्त ‘करून दाखवली’! ज्या गोष्टीचा प्रसार कमीत कमी व्हावा त्यालाच पाठबळ देण्याचे हे धोरण महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवणारे ठरले असते, ते सार्यांनाच ठाऊक आहे. दारूचा पहिला प्याला टाळायला हवा. एकदा का हे व्यसन लागले की त्यातून सुटका होणे कठीण होऊन बसते. दारूमुळे अक्षरश: हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आढळून येतात. कायद्याने निर्बंध असूनही माणसे दारू का पितात असा प्रश्न कोणाला पडेल. परंतु दारूचे व्यसन हा एक आजार आहे आणि त्या आजारातून बरे होता येते ही वस्तुस्थिती देखील समाजाला कळायला हवी. त्यासाठी प्रबोधन हाच एकमेव मार्ग आहे. गटारी अमावस्येच्या दिवशी मन:पूत व्यसन करून दुसर्या दिवसापासून सर्व प्रकारचा तामसी आहार वर्ज्य करण्याची चाल आपल्याकडे आहे. मुळात दीपवती अमावस्येला ‘गटारी’ अशी ओळख मिळणे हीच चुकीची बाब आहे. दिव्यांची अवस हा मंगलमय श्रावण महिन्याचा उंबरठा असतो. या अवसेचे बोट धरूनच श्रावणमास आपल्या घरी चालत येतो. त्याचे स्वागत मद्यप्राशनाने करणे चुकीचेच मानले पाहिजे.