Breaking News

…तर बेमुदत कामबंद आंदोलन करू

नगरपालिका, नगरपंचायत व संवग कर्मचार्‍यांचा राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा

उरण : प्रतिनिधी

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत व संवर्ग कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या राज्य शासनाने आश्वासन दिल्यानंतरही अद्याप प्रलंबित असल्याने या कर्मचार्‍यांमध्ये राज्य शासनाविरोधात असंतोष पसरला आहे. त्यामुळे जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर 2 मे 2022 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीनेच्या वतीने शासनाला देण्यात आला आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव महेश पाठक, आयुक्त तथा संचालक डॉ. किरण कुलकर्णी यांना महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने लेखी निवेदनही देण्यात आले आहे.

निवेदनात मासिक वेतन वेळेवर मिळावे, नव्याने परंतु, पाच वर्षांपूर्वी गठीत झालेल्या नगरपंचायती, मंदिर, ग्रामपंचायतींमधील कायम कर्मचार्‍यांना विनाअट तातडीने समान हक्क देणे, वारसांना नोकरी, सन 2005 पासून प्रलंबित आकृतीबंध तत्काळ तयार करणे, 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देणे, आश्वासित प्रगती योजनेबाबत नगरविकास विभागाने शासन निर्णय पारीत करणे, कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन, 2004 नंतर रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना जूनी पेन्शन योजना लागू करणे यांसह सुमारे 32 मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या मागण्या मान्य नाही झाल्या तर दि. 2 मे 2022 पासून बेमुदत बंद पुकारला जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्य शासनाकडून केवळ आश्वासने!

यापूर्वी मुख्यमंत्री तसेच प्रधान सचिव यांचेसोबत झालेल्या बैठकीत शासनाकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोणतीही कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही, अशी माहिती कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply