शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व गुरूकुल पालक संघाचा संयुक्त मेळावा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व ‘रयत’चे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासासह आरोग्याचाही विकास हे महत्त्वाचे उद्दिष्ट गाठणे सहजसाध्य असून पालकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता अरूणशेठ भगत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अधोरेखित केली. तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्षपदी फेरनिवड झालेले उपाध्यक्ष नामदेव ठाकूर यांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क स्वतः भरल्याचा आवर्जून उल्लेख केला.
प्राचार्या साधना डोईफोडे यांनी प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यालयाच्या भौतिक व आर्थिक परिस्थितीचाही आढावा घेतला, तर गुरूकुल पालक संघाचे सचिव आणि विद्यालयाच्या अनिवासी गुरूकुल प्रकल्पाचे प्रमुख संदीप भोईर यांनी गुरुकुल प्रकल्पाचे उद्देश स्पष्ट करून संस्थेमधील विद्यार्थ्यी गुणवत्ता वृद्धीसाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे प्रतिपादन करून ह्या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली.
भारताच्या स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने ’घर घर तिरंगा’ या अभियानासोबतच प्रभातफेरी व इतर देशभक्ती पर उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी सोबतच पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे यांनी केले. लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांचेही समयोचित भाषण झाले.
पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्षपदी नामदेव ठाकूर यांची फेरनिवड करण्यात आली. पालक प्रतिनिधी म्हणून अपर्णा सतिश नाईक, शिक्षक प्रतिनिधी सहसचिव प्रमोद कोळी यांची निवड झाली. तसेच माता पालक संघाचे सहसचिवपदी दीपाली दीपक गवळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या संयुक्त मेळाव्यात स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विद्यालयाचे पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे, माता पालक संघाच्या सचिव जे. एच. माळी व गुरूकुल प्रमुख संदीप भोईर, क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर तसेच तिन्ही संघाचे पालक प्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे यांनी केले, तर प्रमोद कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.