Breaking News

अवकाळी पाऊस, वादळामुळे मच्छीमार बांधव संकटात

खोल समुद्रातील मासळी गायब; राज्य सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी

उरण : रामप्रहर वृत्त : समुद्रात वारंवार येणारी वादळे, अवकाळी पाऊस यामुळे संकटात सापडलेला मच्छीमार अद्यापही यातून बाहेर येताना दिसत नाही. सध्या मासेमारीसाठी पोषक वातावरण असताना खोल समुद्रात जावूनही म्हणावी अशी मासळी मिळत नसल्याने मच्छीमार बांधव हवालदिल झाला आहे. मासेमारी करण्यासाठी लागणारा बर्फ, डिझेलचा खर्च, तसेच बोटीवरील खलाशांचा पगार कसा द्यायचा या चिंतेने त्याला ग्रासले आहे. म्हणून राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मच्छीमार बांधव करीत आहेत.

जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झालेला असताना मच्छीमार बांधवांनाही याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. क्यांर, बुळबुळ व महाचक्री वादळ अशी एकापाठोपाठ एक चक्री वादळे समुद्रात आल्याने मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला. पावसाळ्यात 1 ऑगस्टला मासेमारी सुरु होते, मात्र समुद्रात आलेल्या वादळांमुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात जाण्यास सुरेक्षाचा उपाय म्हणून अटकाव करण्यात आला होता. मात्र नंतरच्या काळातही अवकाळी पाऊस तसेच खराब हवामानामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात जाता आले नाही.

मागील एक महिन्यांपासून मच्छीमार बांधव मोठ्या आशेने मच्छीमारीसाठी जात आहेत, मात्र त्यांना पुरेशी मच्छी मिळत नसल्याने त्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. खोल समुद्रात जावूनही रिकाम्या हाताने माघारी परतावे लागत असल्याने मच्छीमार संकटात सापडला आहे. याबाबत राज्य सरकारकडे भरपाईची मागणी करुनही त्यांना भरपाई मिळत नसल्याने मच्छीमार बांधवांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply