Breaking News

सुधागड तालुक्यातील आरोग्य सेवा सलाईनवर

रायगड़ जिल्ह्यातील  सुधागड़ तालुक्यात गोरगरीब सर्वसामान्य  रुग्ण, नागरिक व गर्भवती महिलांना आधार असलेल्या आरोग्य केंद्राला घरघर लागली आहे. या ठिकाणची आरोग्य सेवा सलाईनवर असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होताहेत.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, साथीचे आजार उद्भवत आहेत.

गोरगरीब जनतेची मदार ज्या आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांच्यावर आहे, तेथे आज महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथे नागरिकांना कोणत्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळत असेल याची कल्पना न केलेली बरी.

सुधागड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा सलाईनवर आहे. तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 14 आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर व इतर पदे रिक्त आहेत. परिणामी गाव तसेच आदिवासी वाड्यापाड्यांवर आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. शिवाय उपलब्ध कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताणदेखील पडत आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून ही रिक्तपदे भरली जात नाहीत. आरोग्य सेविकांच्या मंजूर 16 पदांपैकी तब्बल 10 पदे रिक्त असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्व प्रकारचे लसीकरण, पोलिओ डोस, कोरोना लस, विविध आजारांची नोंद व औषधोपचार, रोग प्रतिबंधक कामे, आरोग्य विषयक जनजागृती, आरोग्य शिक्षण, गरोदर स्त्रिया व विद्यार्थी यांची तपासणी, शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहचविणे आदी कामे रखडतात व वेळेत होत नाहीत. कम्युनिटी हेल्थ ऑफिसरची 14 पैकी निम्मी पदे रिक्त असल्याने विविध आजारांच्या रुग्णांची माहिती घेणे, नोंदी ठेवणे, त्यांना उपचारासाठी पाठविणे, तसेच कार्यालयीन विविध कामे खोळंबत आहेत. शिपाई नसल्याने साफसफाई व इतर कामे होत नाहीत.

सुधागड तालुक्यात आदिवासी लोकसंख्या जास्त आहे. खेड्यापाड्यात दुर्गम भागात राहणारे लोक हे शासनाने दिलेल्या आरोग्य सेवेवरच अंवलंबून असतात. मात्र रिक्तपदांमुळे तेथे त्यांना आरोग्य सेवा मिळत नाही. परिणामी त्यांना खासगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागत आहे. कधी पैशांअभावी उपचारांवार पाणी सोडावे लागत आहे.

याबाबत बोलताना पेडली येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते दर्शन तळेकर म्हणाले की, आरोग्य सेविका उपलब्ध नसल्याने बर्‍याचदा आरोग्य उपकेंद्र बंद असतात. त्यामुळे लांबून येणार्‍या रुग्णांना परत जावे लागते. त्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. शिवाय वेळ व पैसादेखील वाया जातो. लसीकरण व इतर कामे देखील वेळेवर होत नाहीत. त्यामुळे सर्व रिक्तपदे लवकर भरण्यात यावीत. जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मुळे म्हणाले, ही रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीकोनातून जि. प. कडे नियमित रिक्तपदांच्या आकडेवारीचा अहवाल सादर केला जातो. येथील रिक्त पदे भरल्यास आरोग्य सेवेचे कामकाज अधिक गतीने होईल. तरी उपलब्ध कर्मचार्‍यांवर नागरिकांना वेळवर व चांगली आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

अशी आहेत एकूण रिक्तपदे

कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या मंजूर 14 पदांपैकी 7 पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य कार्यालय सुधागड पाली येथे कनिष्ठ सहाय्यक या मंजूर एक पदापैकी हे पद रिक्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पाली अंतर्गत पदे रिक्त आहेत. यामध्ये आरोग्य सेवक महिला या मंजूर आठ पैकी तब्बल सात पदे रिक्त आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पाली मुख्यालय, उपकेंद्र नाडसूर, सिद्धेश्वर, आपटवणे, नांदगाव, नेणवली व उद्धार येथील पदे रिक्त आहेत. कनिष्ठ सहाय्यक मंजूर एक पदांपैकी हे पद रिक्त आहे. शिपाई मंजूर दोन पदांपैकी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक पद रिक्त आहे. जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त आहेत. यामध्ये आरोग्य सेवक महिला या मंजूर आठ पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र जांभूळपाडा मुख्यालय, उपकेंद्र हातोंड व नवघर येथील ही पदे रिक्त आहेत. शिपाई मंजूर दोन पदांपैकी जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक पद रिक्त आहे. प्राथमिक आरोग्य युनिट खवली येथे औषध निर्माण अधिकारी मंजूर एक पदापैकी हे पद रिक्त आहे. आरोग्य सेवक महिला मंजूर एक पदापैकी हे पद रिक्त आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतीक्षेत जनता

   पालीत ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधकामासाठी 20 कोटी 27 लक्ष रक्कम खर्च करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन मागील महिन्यात माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र गती मिळाली नाही. ग्रामीण रुग्णालय झाल्यास तालुक्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळतील. मागील सहा ते सात वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय प्रलंबित आहे. येथे अजूनही एक वीटदेखील रचण्यात आलेली नाही, असे ग्रामीण रुग्णालयासाठी आंदोलन करणारे हभप महेश पोंगडे महाराज यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ताण

सुधागड तालुक्यात पाली व जांभूळपाडा ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे असून या अंतर्गत 14 उपकेंद्र आहेत. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर जवळपास 43810 लोक अवलंबून आहेत. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर 28861 इतके लोक अवलंबून आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत या आरोग्य केंद्रांवर प्रचंड ताण येतो. शिवाय रिक्तपदे, सोयीसुविधांचा अभाव आणि सर्व उपचार मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. छोटे आजार, सर्पदंश, प्रसूती, अपघातग्रस्तांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात लोकांना जावे लागते. त्यामुळे लोकांची गैरसोय होतेच. त्याबरोबर वेळ व पैसेदेखील अधिक लागतात. परिणामी येथे ग्रामीण रुग्णालय झाल्यास लोकांना या व इतर आरोग्य सेवा येथेच उपलब्ध होणार आहेत. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील ताणदेखील कमी होईल, अशी लोकांची मागणी आहे.

-धम्मशील सावंत, खबरबात

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply