Breaking News

ट्रेकर्स आणि शिव भक्तांनो सावधान

भिमाशंकर अभयारण्यातून जाताय… स्वच्छता कर भरायला लागणार

कर्जत : बातमीदार

बारा ज्योर्तीलिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथील मंदिरात श्रावण महिन्यात लाखो भाविक जात असतात. मुंबईकडील भागातील शिवभक्त आणि ट्रेकर्स हे भिमाशंकर अभयारण्यातून चालत जातात. मात्र त्यांच्याकडून वन विभाग स्वच्छता कर वसूल करीत आहे. वन विभागाच्या या कृतीने शिवभक्त आणि ट्रेकर्समध्ये नाराजी पसरली आहे.

श्रावण महिन्यात भिमाशंकर  महाराजांच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होत असते. श्रावणी सोमवारी तर लाखोंच्या संख्येने शिवभक्त भिमाशंकर येथे पोहचतात. कर्जत तालुक्यातून भिमाशंकरला जाण्यासाठी अभयारण्यातून पायवाट जाते. शेकडो भाविक आणि ट्रेकर्स कर्जत तालुक्यातील खांडस आणि काठेवाडी येथील दोन पायवाटांनी भिमाशंकरला जातात. या मार्गाने अडीच तासात भिमाशंकरला पोहचता येते. मात्र या मार्गातील भिमाशंकर अभयारण्यातून गेल्यानंतर स्वच्छता कर वसूल करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. त्याच फटका रायगड तसेच मुंबई, ठाणे येथील ट्रेकर्स आणि शिवभक्तांना बसत आहे. स्वच्छता कराच्या रुपात 60रुपयांचा भुर्दंड बसत असल्याने शिवभक्तांत नाराजी पसरली आहे.

श्रावण महिन्यात हजारो शिवभक्त आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील अभयारण्यातून भिमाशंकरला जात असतात.  या भागातून जाताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही घेतो असतो, असे असतानाही वन विभाग भिमाशंकर येथे 60 रुपये स्वच्छता कर आकारात आहे, हे चुकीचे आहे.

-मंगल ऐनकर, सरपंच, खांडस ग्रामपंचायत

आम्ही भिमाशंकर अभयारण्यामध्ये निसर्गाचा आनंद घेत नेहमी जातो. मात्र यावर्षी भिमाशंकर तलाव येथे वन विभाग पर्यटक, ट्रेकर्स आणि शिवभक्त यांच्याकडून स्वच्छता कर वसूल करीत होता. आम्ही स्थानिक आहोत, असे अनेक शिवभक्त सांगत होते, तरीही वन विभाग ऐकत नव्हते.

-डॉ. दिनेश चौरासिया, ट्रेकर

कर्जत तालुक्यातील शेकडो शिवभक्त दर सोमवारी चालत भिमाशंकरला जातात. आमच्यासारख्या जंगलाचे रक्षण करणार्‍या स्थानिक भाविकांकडून वन विभागाने स्वच्छता कर वसूल करणे, अन्यायकारक आहे. त्याचा वन विभागाने फेरविचार करायला हवा.

-कैलाश महाराज भोईर, स्थानिक शिवभक्त, कर्जत

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply