Breaking News

नेरळ-कळंब एसटीसाठी थोड थांबावे लागणार

दोन ठिकाणचा रस्ता करावा लागणार दुरुस्त

कर्जत : प्रतिनिधी

नेरळ-कळंब राज्यमार्गावरील 150 मीटर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या मार्गावरील एसटी गाड्यांच्या फेर्‍या बंद आहेत. त्याचा फटका 50हून अधिक गावे आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना बसत आहे. या रस्त्याची प्रशिक्षण बस आणून चाचणी घेतली मात्र रस्ता दोन ठिकाणी दुरुस्त केल्यास लगेचच या मार्गावर एसटी सुरू करण्यात येईल, असे एसटी महामंडळाच्या कर्जत आगारातर्फे सांगण्यात आले.

नेरळ-कळंब रस्त्याचे काम अर्धवट असल्याने कर्जत एसटी आगाराने या मार्गावरील गाड्या बंद ठेवल्या आहेत. नेरळ स्थानकातून कशेळे, शिंगढोळ, नेरळ-गुडवण तसेच कर्जत याशिवाय नेरळ-कळंब रस्त्यावरून धावणार्‍या नेरळ-वारे, नेरळ-कळंब, नेरळ-बोरगाव, नेरळ-ओलमण, नेरळ-मुरबाड तसेच कळंब-वांगणी, नेरळ-देवपाडा आणि नेरळ-पोशीर या एसटी गाड्या चालविल्या जातात. कर्मचार्‍यांचा संप मिटल्यावर कर्जत आगाराने नेरळ एसटी स्थानकातून गाड्या सुरु केल्या. मात्र नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ, धामोते येथे रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी रस्त्याच्या एका लेनचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे एसटी गाड्यांच्या फेर्‍या अजूनही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने जून महिन्यापासून स्थानिक विद्यार्थ्यांना बसत आहे.

दरम्यान, कर्जत एसटी आगाराचे व्यवस्थापक  शंकर यादव यांनी पेण विभागीय कार्यालयाकडून आलेल्या प्रशिक्षण बसने नेरळ एसटी स्टँड तसेच नेरळ ते दहिवली पुलाची पाहणी केली. त्यांच्या बरोबर  सहाय्यक वाहतूक निरीक्षक ज्योतिराम ठोंबरे, महादेव पालवे, देवानंद मोरे, चालक निलेश लांडगे व निलेश भायदे होते.

या पाहणीत सुर्या गॅलक्सी या इमारतीसमोर एका ठिकाणी रस्ता खचला आहे तसेच थोडे पुढे एक छोटी मोरी आहे, तेथील रस्ता खूप अरुंद आहे. तेथून एसटी बस जेमतेम जाते. तेथे एसटी बस कधीही खाली जाईल व अपघात होऊन प्रवाशांना दुखापत होण्याची शक्यता आहे. तेथील रस्ता दुरुस्त केल्यानंतर एसटी प्रवाशांना सुरक्षितपणे घेऊन जाऊ शकेल, असे अधिकार्‍यांनी बोलून दाखविले. याबाबतचा अहवाल विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येईल आणि त्या कार्यालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर या मार्गावर एसटी बस सुरू होईल असे या अधिकार्‍यांनी सांगितले.

आम्ही या मार्गावरून एसटी बस फिरवून पाहणी केली. मात्र प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने कोणताही धोका पत्करून एसटी बस सुरू करणे योग्य नाही. दोन ठिकाणी अरुंद रस्ता आहे. तो दुरुस्त केल्यावर त्याचा अहवाल विभागीय कार्यालयाकडे जाईल. तेथून आदेश आल्यानंतर या रस्त्यावरून लगेचच एसटीच्या फेर्‍या सुरू करण्यात येतील.

-शंकर यादव, आगार व्यवस्थापक, कर्जत

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply