पनवेल : वार्ताहर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमात घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत नागरिकांना नाममात्र दरात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार घरोघरी तिरंगा मोहिमे अंतर्गत नागरिकांसाठी ध्वज विक्री केंद्र पनवेल तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत घरांच्या यादी प्रमाणे झेंड्याची ऑर्डर देण्यात आली आहे. त्याचप्रमाने प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत झेंड्याचे वाटप केले जाणार आहे. तसेच ज्या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांच्यामार्फत मोफत वाटप केले जाणार आहे, परंतु ज्या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्या सवलतीच्या दरात विक्री करणार आहेत. पनवेलच्या तहसील कार्यालयात सर्व कार्यालयप्रमुख, पोलीस विभाग आणि सर्व शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापकांची एक बैठक झाली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी व जनजागृती व्हावी तसेच या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभावा या अनुषंगाने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी 13 ऑगस्टला ध्वज उभारून 15 ऑगस्टला उतरायचा आहे. तसेच सरकारी कार्यलये, शाला, महाविद्यालये, ग्रामपंचायत यासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी तिरंगा ध्वज फडकवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभातफेरि काढणे, पोस्टर, बॅनर, जींगल्स, आदि माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धि करण्याचे आवाहन तहसीलदार विजय तळेकर यांनी केले आहे.