खोपोली : प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकातून गरजू प्रवाशांना ऑटोरिक्षा सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी स्थानिक रिक्षा चालकांकडून येथे अधिकृत रिक्षा स्टँड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासन व खोपोली नगरपालिकेकडून यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने, प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच रिक्षा परिसरातील रस्त्यावर उभ्या राहत असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी व गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.
खोपोली रेल्वे स्थानक परिसरात अधिकृत रिक्षा स्टँडसाठी जागा देण्याची मागणी, येथील सर्व रिक्षा चालक मालक संघटनांनी रेल्वे प्रशासन व खोपोली नगरपालिकेकडे केली आहे. मात्र या बाबत अद्याप कोणताही निर्णय होत नसल्याने, रिक्षा रस्त्यावर उभ्या राहत असल्याचे रिक्षा चालकांनी सांगितले. मात्र याचा फटका वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.