गव्हाण ः रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे फुंडे येथे न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विभागीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजची इयत्ता आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी दिक्षा रमेश वर्तक हिने विभागीय पातळीवर द्वितीय क्रमांक पटकाविला. ’रस्ते अपघातापासून स्वातंत्र्य मिळविण्यात माझे योगदान’ या विषयावर केलेल्या भाषणात दीक्षा वर्तक या विद्यार्थ्यीनीने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. या वेळी न्हावाशेवा वाहतूक शाखा नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, उरण वाहतूक शाखा, नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दिक्षा वर्तकची नवी मुबंई आयुक्तालय स्तरावर होणार्या पुढील फेरीसाठी निवड झाली आहे. पुढील स्पर्धा विष्णुदास भावे नाट्यगृह येथे 12 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्यद्वय प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, विद्यालयाचे पर्यवेक्षक दीपक भर्णुके,रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर आदींनी दिशाचे अभिनंदन केले आहे.