Breaking News

पामबीच मार्गाच्या वेगावर येणार नियंत्रण

अपघात कमी करण्यासाठी बसविणार रंबलर्स

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईतील पामबीच मार्ग हा वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता म्हणून सुपरिचित आहे. तथापि या रस्त्यावर  होणारे अपघात हा चिंतेचा विषय असून या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वाहतुक पोलीसांच्या सहयोगाने प्रयत्नशील आहे. याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त  अभिजित बांगर यांनी वाहतुक पोलीस विभागासमवेत तातडीने बैठक घेत सखोल चर्चा केली. पाम बीचवर आवश्यक त्या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने वाहतुक पोलीस विभागासमवेत पाहणी करून ठिकाणे निश्चित करावीत व त्याठिकाणी वाहन वेग नियंत्रित करण्यासाठी रम्बलर बसविण्याची कार्यवाही त्वरित करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

वाहतुक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आणि नमुंमपा शहर अभियंता संजय देसाई यांचे समवेत सविस्तर चर्चेमध्ये मोराज सर्कल सानपाडा, अक्षर सिग्नल, टीएस चाणक्य व सारसोळे सिग्नल ही पामबीच मार्गावरील चार ठिकाणे सर्वाधिक अपघातप्रवण अर्थात ब्लॅकस्पॉट असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्या ठिकाणी प्राधान्याने उपाययोजना करण्याबाबत विचारविनीमय करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापूर्वी पाम बीच मार्गावरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने आय.आय.टी.मार्फत पाहणी करण्यात येऊन सूचविण्यात आलेल्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. पाम बीचवर झालेल्या अपघाताच्या विविध कारणांचा विचार करताना चालकाचे वेगावर नियंत्रण सुटणे ही बाब प्रामुख्याने दिसून येत आहे.

वाहतुक पोलीस विभागामार्फत स्पीड गनद्वारे वेग मर्यादा ओलांडणार्‍या बेजबाबदार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. तथापि वाहनांवर नजर ठेवत असताना स्पीड गनला वाहन संख्येची मर्यादा असल्याने पामबीच मार्गावरील प्रमुख ब्लॅकस्पॉटवर टोमॅटिक हाय स्पीड डिटेक्शन असणारे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्याचे  निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले. याव्दारे वाहनांच्या वेगमर्यादेवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून वेगाचे उल्लंघन करणार्‍या वाहनांची नोंद टोमॅटिक पोलीस नियंत्रण कक्षामध्ये होऊन त्यांच्यावर ई चलनमार्फत दंडात्मक कारवाई होणार आहे. त्याचप्रमाणे पाम बीचवर ठिकठिकाणी बसविण्यात येत असलेल्या सीसीटिव्हीच्या माध्यमातून रेड लाईट व्हायलेशन तसेच नंबर प्लेट डिटेक्शन होणार असून असे नियमभंग करणार्‍या वाहन चालकांवरही कारवाई केली जाणार आहे.

यासोबतच पाम बीचवर आवश्यक त्या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने वाहतुक पोलीस विभागासमवेत पाहणी करून ठिकाणे निश्चित करावीत व त्याठिकाणी वाहन वेग नियंत्रित करण्यासाठी रम्बलर बसविण्याची कार्यवाही त्वरित करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय पामबीचवरील वेगमर्यादा, ती मर्यादा ओलांडल्यास त्यावरील दंडात्मक कारवाई तसेच अपघातप्रवण क्षेत्र अशी धोक्याची सूचना देणारे मराठी व इंग्रजी भाषेतील फलक सहज नजरेस प़डतील अशाप्रकारे ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आदेशही आयुक्तांनी या वेळी दिले. अशाचप्रकारे ठाणे बेलापूर मार्गाचीही संयुक्त पाहणी करून तेथेही वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

पाम बीच मार्गावर होणारे अपघात हे प्रामुख्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच घडत असल्याचे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आवश्यक अशा उपाययोजना वाहतुक पोलीस विभागाचे सहकार्य घेऊन करीत आहे. तथापि यामध्ये वाहन चालकांची जबाबदारी सर्वांत मोठी असून प्रत्येक चालकाने वाहनाच्या वेग मर्यादेचे पालन करावे, तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून अपघातविरहित सुरक्षित प्रवास करावा.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply