सौर वर्षामध्ये बारा महिने असतात, त्यांना आपण मराठी महिने असे म्हणतो. या प्रत्येक महिन्याचे काही ना काही वैशिष्ट्य किंवा वेगवेगळेपणा असतोच. तरीही त्यातल्या त्यात सणांचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. त्यामुळे श्रावण महिना प्रत्येकाला आवडतो. श्रावण महिना सुरू झाला की, सगळीकडे उत्साह आणि आनंद असतो. विशेष म्हणजे सणांची जणू साखळीच या महिन्यात सुरू होते. महिलांचा तर आनंद या महिन्यात व्दिगुणीत होतो. अनेक महिला या महिन्यात देव-देवतांची मोठ्या भक्तीभावाने उपासना करतात.
नागपंचमी, राखीपौर्णिमेनंतर हळूहळू गणपती उत्सवाची चाहुल लागते. हा सण कोकणात तर मोठ्या उत्साहाने आणि भक्तीमय वातावरणात साजरा होतो. गणपती उत्सव आता अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेवला आहे. चित्रशाळांमध्ये गणपती तयार झाले आहेत. चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी तयारी सुरु केली आहे. गावी जाण्याचे नियोजन त्यांचे पूर्ण होत आले आहे. या सणाला वेळेत पोचता यावे म्हणून तीन महिने अगोदर रेल्वेचे बुकींग होते. एसटी, खासगी गाड्यांनी चाकरमानी कोकणात पोचतात. मिळेल त्या वाहनाने एकदाचे गाव गाठतात. एरवी कोणत्याही सणात काही कारणांमुळे न पोहणारे चाकरमानी आपल्या गणपतीला आवर्जुन पोचतात. नोकरीनिमित्त बाहेर गावी असलेल्यांची गावातील बंद घरे उघडतात. गणपतीमध्ये गावात सगळीकडे उत्साहाचे आणि एकोप्याचे दर्शन दिसून येते. प्रसंगी एरवी साध्या कुंपणावरुनही होणारे वाद या दिवसात थांबलेले असतात. प्रत्येक जण आपला सण साजरा करण्यामध्ये व्यस्त असतो. शेतकरीही आपली शेतीतील कामे आटपून गणपती सणाच्या तयारीला लागलेला असतो. एकूणच श्रावण महिन्यातील सर्वच सण उत्साहाचा जणू आनंद घेऊन येत असतात. त्या पुढील सण म्हणजे नवरात्र, दिवाळी हे सण असतात. एकूणच सणांमधील आनंद काही वेगळाच असतो. आपल्या कृषिप्रधान भारत देशात आजही शेतकर्यांचा मित्र असणार्या पिकांची नासधूस करणार्या उंदीर-घुशींचा नायनाट करणार्या सर्पदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीला नागाची पूजा करुन प्रार्थना केली जाते. पंचमीनंतर येणारी राखीपौर्णिमा म्हणजे स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा सण. राखीपौर्णिमेच्या आधी पंधरा दिवस तर भावाला कोणती राखी घ्यावी, यासाठी बहिणींची लगबग सुरु असते. भावाची आतुरतेने या दिवशी वाट पाहिली जाते. भावाला वेळ नसेल तर बहिण भावाच्या घरी जाते. नारळीपौर्णिमेला आवर्जुन नारळभात केला जातो. कोळीबांधव तर दर्जाराजाची पूजा करुन मासेमारीला सुरुवात करतात. कोळीबांधवांमध्ये मोठ्या उत्साहात नारळीपौर्णिमा साजरी होते. कोरोनानंतर दोन वर्षे सणांवर बंधने आली होती. आता स्थिती पूर्वपदावर आल्यामुळे सण मोठ्या उत्साहात साजरे होऊ लागले आहेत. सणांवरील निर्बंध उठविले आहेत. श्रावणात येणारे विविध सण मोठ्या भक्तीभावाने साजरे होतात. पण याचबरोबर सोमवार, शुक्रवार, मंगळागौर, सत्यनारायण हे खास श्रावणातील मानकरीच असतात. श्रावणात सत्यनारायणाची पूजा बरेच जण करतात. महिलावर्ग या महिन्यात देव-देवतांची उपासना करतात. महिला आपल्या कुटूंबासाठी चांगले आरोग्य, सुखसमृध्दीसाठी परमेश्वर चरणी लीन होतात. खरे तर श्रावणातील प्रत्येक दिवस काही तरी चांगले देत असतो. या महिन्यातील प्रत्येक दिवसच जणू सण होऊन जातो. अशा या आनंदी वातावरणामुळेच संपूर्ण घरातच एक उत्साहाचे वातावरण असते. सण, व्रतवैकल्यामध्ये जणू एक प्रेरणाच मिळते. संसारातील सुख-दुःखे बाजुला करुन महिलावर्ग या सणात एकत्र येतो. मन मोकळे करून सख्यांना समजून घेण्याचे हक्काचा क्षण हा महिना देऊन जातो. महिलांच्या वेगवेगळ्या फु गड्या याच महिन्यात पाहायला मिळतात. सगळीकडे आनंदी आनंद असतो. श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो. सर्वत्र वातावरण आल्हाददायी व उत्साही असते. झाडे-वेली प्रफुल्लित असतात. सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते व श्रावण महिन्यात पाऊस सुध्दा पडत असतो, त्यामुळे सगळीकडे वातावरण सुध्दा कसे छान असते. सगळीकडे हिरवे हिरवेगार असते. जणू निसर्गाने हिरवी शालच पांघरली की काय असा भास होतो. नवचैतन्य निर्माण करणार्या या सणांना आजही पूर्वीप्रमाणेच महत्त्व आहे. काळानुरूप सणवार साजरे करण्याच्या पद्धती बदलत असल्या तरी त्यांचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. आधुनिकतेची सणांना जोड आली तरी पारंपरिक पध्दतीवर तेवढाच भर असतो. श्रावणातील सणांकडे पाहिले की हे सर्व दिसून येते. श्रावणात पावसाच्या हलक्या सरींबरोबर मनउल्हासित झाले नाही तरच नवल. स्त्रियांच्या भावविश्वात पावसाचे स्थान अनन्यसाधारण आहे. पावसाच्या सरींबरोबर गाण्यांच्या सप्तसुरांमधून मन मोकळं करण्याची हातोटी असल्यामुळे पाऊस, सणवार आणि गाणी हे जणू समीकरण श्रावणात पक्क झाले आहे. नागपंचमी, मंगळागौरीला रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा यासारखे खेळ खेळताना पारंपरिक गाण्यांची आठवण होणे तितकेच स्वाभाविक आहे. पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर पडण्याची संधी मिळत नसे. मात्र सणांमुळे त्यांना आनंद मिळून जायचा. थोडे त्यांना मोकळे होता येत होते. सणांमध्ये सर्वजण भेटत असतात. आजच्या स्त्रिया नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडू लागल्या आहेत. मात्र ऑफिस, स्वत:च्या व्यवसायातील कामांचा व्याप संपवतही त्या आपल्या घराकडे तेवढेच लक्ष देतात. आजची आधुनिक स्त्री पाश्चात्यांच्या प्रभावाखाली आली असून भारतीय परंपरांकडे पाठ फिरवते अशी टिका होते. मात्र यात तथ्य नाही. परिस्थिती या उलट आहे. भारतीय परंपरा नाकारणार्या किंवा त्याकडे पाठ फिरवणार्या महिलांचा गट फारच छोटा आहे. आपण सामान्य स्त्रियांचा विचार करतो तेव्हा या परंपरा आणि सणावारांना महत्त्व देणार्यांची संख्या जास्त असल्याचे जाणवते. परंपरांना महत्त्व देणार्या स्त्रिया तर या परंपरा जिवंत ठेवणार्या मुख्य आधारस्तंभ मानल्या जातात. सणांकडे महिला प्राधान्याने लक्ष देतात. वेळात वेळ काढून सण छान पध्दतीने साजरा करण्याकडे त्यांचा विशेष लक्ष असतो. दरम्यान, श्रावण महिन्यातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी सर्व जण नियोजन करतात. निसर्गाच्या सौंदर्यांची ही लयलूट पहायला पर्यटक अनेक ठिकाणी पर्यटनाला जातात. डोंगरातून कोसळणारे उंच धबधबे, रानफुलांनी सजलेले छोटे छोटे डोंगर, माळ, उन-सावलीचा खेळ आदि दृश्य पाहायचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात श्रावणात येणारे सण यामुळे खूप काही या महिन्यात मिळून जाते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत श्रावणमासातील सर्व व्रतवैकल्ये पाळणे काहीसे अशक्य होऊ लागले असले तरी विशिष्ट सण अगदी उत्साहाने साजरे केले जातात. सणांच्या निमित्ताने निसर्गाशी तुटलेला संवाद पुन्हा साधला जातो. काळ बदलत गेल्यामुळे आपल्या परंपरांचा विसर पडतो असे नाही. आजच्या आधुनिक काळातील मुली आणि स्त्रियांनी आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला असला तरी परंपरांकडे पाठ फिरवलेली नक्कीच नाही. परंपरांचे जतन करताना आवश्यक तिथे काही बदल केले जातात. पण मूळ विचार, संवेदना संपत नाहीत. मन, निसर्ग आणि संस्कृती यांच्या समीकरणातून निर्माण झालेल्या या परंपरा दीर्घकाळ टिकून राहतील इतक्या परिपक्व आहेत हे विसरून चालणार नाही.
-अस्मिता सावंत
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …