Breaking News

25 एकांकिका अटल करंडक राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त
अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत विविध केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीनंतर एकूण 25 एकांकिकांची अंतिम फेरीसाठी परीक्षकांनी निवड केली आहे. अंतिम फेरी 8 ते 10 डिसेंबरदरम्यान सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतरही पारितोषिके आहेत, तर यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
नाट्यचळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान स्व. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालू रहावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा हे ब्रीदवाक्य घेऊन अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून भरत सावले व दिनेश गायकवाड यांनी काम पाहिले. आता अंतिम फेरीचे उद्घाटन 8 डिसेंबर रोजी, तर पारितोषिक वितरण सोहळा 10 डिसेंबरला होणार आहे. यंदाच्या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध मालिका व सिनेअभिनेते अजिंक्य ननावरे, मुख्य प्रायोजक टीआयपीएल, सहप्रायोजक निल ग्रुप, तर मीडिया प्रायोजक इट्स माजा डॉट कॉम आहे.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका
प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तो, पाऊस आणि टाफेटा), माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन, बुलढाणा (अनपेक्षित), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक (अ डील), देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज, कोल्हापूर (असणं नसणं), आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, नागठाणे (शहीद), कलाकार मंडळी, पुणे (चाहुल), मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे (सिनेमा), रेवन एंटरटेंमेंट, पुणे (हॅलो इन्स्पेक्टर), फनकार क्रिएटीव, अहमदनगर (बोळवण), सीकेटी महाविद्यालय (स्वायत्त), नवीन पनवेल (काक्षी), बॅकस्टेज वाला ग्रुप, पनवेल (आऊट बर्स्ट), त्रिकुटालय थिएटर, पनवेल (क्वीन ऑफ द नाइट), ढ मंडळी, कुडाळ (ढीम टँग, ढीटँग), एम.डी. कॉलेज, मुंबई (पुंडलिका भेटी), खालसा महाविद्यालय, मुंबई (लोकल पार्लर), रंगसंगती, मुंबई (सुमित्रा), ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे (उणिवांची गोष्ट), व्हाइट लाईट, ठाणे (अनोळखी), नटवर्य रंगमंच, विरार (नारायणास्त्र), केईएस कॉलेज, मुंबई (अलॉव मी), कलांश थिएटर, मुंबई (जिन्याखालची खोली), स्वर्ण पटकथा, क्राऊड (खुदिराम), नाट्यस्पर्श आणि भवन्स कॉलेज, अंधेरी (टोपरं), वसा नाट्यपरंपरेचा (काव काव), निर्मिती, वसई (अम्मा).

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply