Breaking News

विकासाचा पंचसंकल्प

अनेक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणजे नेमके काय घडले हे नवीन पिढ्यांना कळायला हवे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा पंच्याहत्तर आठवडे चालणारा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच हेतूने जाहीर केला होता. सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीमधील लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षांबद्दल गौरवोद्गार काढलेच आणि त्याचबरोबर 2047 सालापर्यंत भारत पूर्णत: प्रगत देश म्हणून ओळखला जाईल याची ग्वाही देखील दिली. यासाठीचा ‘रोडमॅप’च त्यांनी आपल्या 83 मिनिटांच्या भाषणात उलगडून सांगितला. ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ ही भव्य आणि अनोखी संकल्पना राबवण्यात आली. या निमित्ताने देशभरातील घराघरांमध्ये तिरंगा फडकताना दिसला. हे दृश्य अवर्णनीय होते. वास्तविक तिरंगा फडकवणे कोणालाही सक्तीचे नव्हते. असल्या योजनांमुळे दाखवेगिरी पलीकडे काय हाती लागणार आहे असा कडवट सवाल विरोधकांकडून करण्यात आला. परंतु त्याला न जुमानता भारतीय जनतेने अभिमानाने भारतीय झेंडा आपल्या घराच्या खिडक्यांमध्ये, सज्जांमध्ये, छपरांवर आणि अंगणात रोवलाच. इतकेच नव्हे तर पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार कोट्यवधी नागरिकांनी आपापले डीपी बदलले. पंतप्रधान मोदी यांच्या शब्दाला भारतीय जनता किती मान देते याचाच हा पुरावा आहे. प्रत्येक गोष्ट मतांच्या गणितात मोजणार्‍या विरोधकांना हे वास्तव कधी समजणार कोण जाणे! लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी प्रगत भारताच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी पाच महत्त्वाचे संकल्प सोडण्याचे आवाहन केले. भारताच्या उदात्त आणि उज्ज्वल परंपरांचे जतन, भारतीयत्वाचा गर्व, विज्ञान-तंत्रज्ञानासह संशोधनाकडे लक्ष, स्त्रियांचा योग्य तो सन्मान आणि नागरिकाचे कर्तव्य या पाच मुद्दयांवर विशेष भर देऊन प्रगतीचा मार्गच त्यांनी जनतेसमोर ठेवला. याच भाषणात त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक कोरडे ओढले. भ्रष्टाचाराची ही वाळवी समूळ नष्ट करण्यासाठी दृढ संकल्पाची गरज आहे. त्यासाठी 130 कोटी जनतेचे साह्य आणि समर्थन मला हवे आहे, अशा नि:संदिग्ध शब्दांमध्ये त्यांनी आपला मनोदय कठोरपणे सांगितला. अनेकदा भ्रष्टाचार्‍यांना निष्कारण सन्मान मिळतो. भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतर देखील त्यांचा उदो उदो होताना पाहावे लागते. हे सर्वथा गैर आहे, असे ते म्हणाले. राजकारणातील भाई-भतीजा संस्कृती अशीच जागरूकपणे नष्ट करावी लागेल असा परखड विचार त्यांनी मांडला. पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या विरोधातील या मतांबद्दल राजकारण पेटणार हे स्वाभाविकच होते. त्यानुसार काँग्रेससारख्या विरोधीपक्षाच्या नेत्यांनी ताबडतोब पलटवार करण्याचा प्रयत्न केला खरा. परंतु त्यात जोर नव्हता. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमामुळे पंतप्रधान मोदी यांच्या पाठिशी संपूर्ण देश ताकदीनिशी उभा आहे हे सार्‍या जगाला दिसून आले आहे. कुठल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती मते पडणार आणि मतांच्या धृविकरणासाठी राजकीय गणिते कशी बांधायची याच राजकीय चिखलामध्ये अडकून पडलेल्या विरोधीपक्षांना अजुन एवढे देखील कळलेले नाही की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता कधीच पुढे निघून गेली आहे. या राजकीय चिखलफेकीमध्ये भारतीय मतदारांना आता फारसा रस उरलेला नाही. गेल्या पंच्याहत्तर वर्षांमध्ये स्वतंत्र भारताने नेमके काय कमावले याचे उत्तर पाच अक्षरांत देता येईल. ती पाच अक्षरे म्हणजे ‘नरेंद्र मोदी’.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply